Breaking News

एकाच आसनावर तीन-चार परीक्षार्थी ; विद्यापीठाकडून ‘विजयेंद्र काबरा’तील परीक्षा केंद्रच बदलले


औरंगाबाद :
येथील खोकडपुरा भागातील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात पदवी परीक्षेच्या गुरुवारच्या प्रश्नपत्रिकेदरम्यान, एकाच आसन क्रमांकावर तीन-चार परीक्षार्थीना बसवण्यात आले होते. अनेक परीक्षार्थी सामूहिक कॉपी केल्यासारखे परस्परांची उत्तरे पाहून लिहित असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दखल घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तत्काळ कारवाई करत विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्र बदलले आहे.

विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना १ जूनपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी अनेक परीक्षार्थीना ऐनवेळी परीक्षा केंद्राचे प्रवेशपत्र मिळाले. त्यामुळे केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी बीसीएच्या प्रथम व तृतीय वर्षांच्या प्रशनपत्रिकेदरम्यान विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात अचानक परीक्षार्थीची गर्दी वाढली. दरम्यान, यासंदर्भात महाविद्यालय प्रशासनाने सांगितले,की केंद्र म्हणून ४६६ परीक्षार्थीच्या नावांची यादी प्राप्त झालेली होती. मात्र अचानक सहाशेंवर विद्यार्थी वाढल्याने ऐनवेळी आसनव्यवस्थेचे नियोजन करता येणे शक्य नव्हते. आलेल्या विद्यार्थ्यांनाही परत पाठवणे म्हणजे त्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यासारखे झाले असते. त्यामुळे एका आसन क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांना बसवण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

आपण स्वत: काबरा महाविद्यालयात जाऊन पाहणी केली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांकडे व संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रमुखांकडेही सविस्तर अ्हवाल मागवलेला आहे. हे दोन्ही अहवाल आल्यानंतर जो काही असमन्वय घडलेला आहे, त्याला कोण जबाबदार आहे, त्यानुसार कारवाई केली जाईल. संबंधित परीक्षा केंद्राला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. येथील विद्यार्थी इतर दोन महाविद्यालयांच्या केंद्रांवर वर्ग केले जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments