बारावी परीक्षेचा निकाल याच आठवड्यात

 बारावी परीक्षेचा निकाल याच आठवड्यात जाहीर करण्यात येणार 



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल याच आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.

हा निकाल 8 किंवा 9 जून रोजी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे राज्य मंडळातील सूत्रांनी सांगितले. राज्य मंडळाने यंदा परीक्षा घेण्यावर ठाम राहत दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या.


काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदलदेखील करावे लागले. त्यामुळे दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडली. दहावी परीक्षेला राज्यभरातून तब्बल 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी बसले होते. तर, बारावीच्या परीक्षेला 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते.


बारावीचा निकाल 10 जूनला जाहीर करण्यात येईल, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, राजकीय दबावापोटी त्याच तारखेला निकाल जाहीर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे निकाल एक किंवा दोन दिवस अगोदरच जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर करण्याचे श्रेय घेण्यासाठी तारखेत बदल करण्यात येणार असून, तारीख शालेय शिक्षणमंर्त्यांकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.


त्यामुळे प्रशासन आणि राजकीय श्रेयवादाची लढाई रंगणार असली, तरी निकाल मात्र याच आठवड्यात जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील पंधरा दिवसांमध्ये दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचेदेखील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.


बारावी निकालाची अधिकृत तारीख सांगता येणार नाही. मात्र, निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

– शरद गोसावी, अध्यक्ष, शिक्षण मंडळ


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या