महिलांचा संघर्ष अजूनही संपलेला नाही: मुक्ता बर्वेनी व्यक्त केली खंत


 पुणे :  एकविसाव्या शतकातही महिलांचा संघर्ष संपलेला नाही, अशी खंत प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केली. स्त्री भ्रूण हत्या ही समस्या केवळ ग्रामीण भागाची राहिलेली नसून त्याचे लोण शहरातील उच्चशिक्षित कुटुंबांमध्येही पसरले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गांधीपेठ तालीम मंडळाच्या वतीने चिंचवड ‘एल्प्रो मॉल’ येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, जिजाऊ व्याख्यानमाला समितीच्या मेधा खुळे, गीतल गोलांडे आदी उपस्थित होते.

…हे धक्कादायक आणि कटू वास्तव आहे –

मुक्ता बर्वे म्हणाल्या, “स्त्री भ्रूण हत्या ही ग्रामीण भागातील आणि अडाणी कुटुंबांमधील समस्या असल्याचे मानले जात होते. तथापि, मोठ्या शहरातील उच्चशिक्षित कुटुंबातही तशीच परिस्थिती आहे. शहरी भागातील महिलादेखील अशा अत्याचाराच्या बळी पडल्या आहेत, हे धक्कादायक आणि कटू वास्तव आहे. महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी जनजागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ”

तर, गोलांडे म्हणाले की, “मुक्ता बर्वे यांनी चिंचवडगावात बालपण व्यतीत केले असून शिक्षणही येथे घेतले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक प्राप्त केला असून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकीसुद्धा जपलेली आहे.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या