अजून एक दहशतवादी अटक.....

 लवकरच पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणारबंदी असलेल्या लष्कर ए तोयबा या संघटनेत भरतीसाठी कार्यरत असलेल्या आणखी एकाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) स्थानिक पोलिसांच्या मदतीने जम्मू- काश्मीरमधून अटक केली. त्याला तेथील स्थानिक न्यायालयाने प्रवासी कोठडी मंजूर केली असून, त्याला लवकरच पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

एटीएसचे पथक त्याला पुण्याकडे घेऊन पुण्याकडे निघाले आहे. यापूर्वी दापोडी परिसरातून अटक केलेल्या मोहम्मद जुनैद याच्या संपर्कात तो होता.

आफताब हुसेन शाह (२८, रा. किस्तवाड प्रांत, जम्मू-काश्मीर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आफताब हा मुळचा जम्मू-काश्मीरच्या किश्तवार प्रांतातील रहिवासी असून, तो व्यावसायाने सुतार आहे. त्याची तेथे जमीन देखील आहे. तो जुनैद मोहम्मद आणि विदेशात लष्कर ए तोयबासाठी काम करणाऱ्या हस्तकांचा संपर्कात होता.

दापोडी परिसरातून २४ मे रोजी मोहम्मद जुनैद मोहम्मद अता याला एटीएसने अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आफताब याची माहिती मिळाली होती. त्यानंतर एटीएसच्या पथकाने थेट जम्मू-काश्मीर गाठून कारगील, गंदरबाल, श्रीनगर आदी विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयीत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी आफताब हा श्रीनगर पासून २१ किलोमीटरवर असलेल्या किश्तवार येथे असल्याची माहिती मिळाली. तेथे जाऊन आफताबला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती एटीएसच्या हाती लागण्याची शक्यता आहे. एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त अरूण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसच्या निरीक्षक मंजुषा भोसले या प्रकरणी तपास करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या