सलग टीव्ही दर्शन हृदयविकाराला आमंत्रण

 


तुम्ही जर दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम अधिक वेळ पाहत असाल, तर सावधान! कारण एका नवीन संशोधनानुसार हृदयविकार आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहण्याचे व्यसन यांचा खूप जवळचा संबंध आहे.

'रोज एक तासापेक्षा कमी वेळ दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहिले तर हृदयविकाराच्या रुग्णांच्या संख्येत ११ टक्क्यांची घट होऊ शकते,'' असे हाँगकाँग विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक आणि संशोधक डॉ. यंगवॉन किम यांनी सांगितले.

ग्लुकोज आणि कोलेस्ट्रेरॉल यांचे वाढलेले प्रमाण आणि दूरचित्रवाहिन्या पाहण्याची वेळ यांचा जवळचा संबंध असल्याचेही स्पष्ट झाले आहे,'' असेही त्यांनी सांगितले.

४० ते ६९ वयोगटातील ३ लाख ७३ हजार ब्रिटिश नागरिक या संशोधनात सहभागी झाले होते. त्या वेळी त्यांना हृदयविकार नव्हता. त्यांच्या दैनंदिन टीव्ही पाहण्याच्या कालावधीचा तपशील पुढील काही काळ अभ्यासला गेला. संशोधकांनी राष्ट्रीय मृत्यू नोंदणी आणि रुग्णालयात दाखल व्यक्तींचा अभ्यास केला, त्या वेळी त्यांना ९१८५ जणांना हृदयविकार असल्याचे आढळले होते. या संशोधनामुळे अधिक वेळ दूरचित्रवाहिनी पाहणाऱ्यांसाठी एकीकडे धोक्याचा इशारा मिळाला आहे. त्याचबरोबर आनुवंशिकतेबरोबरच वय, लिंग, आहार, व्यायाम आणि धूम्रपान यांचाही हृदयविकाराशी संबंध आहे, असेही स्पष्ट झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या