यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले नाहीत

 


अमेरिकेत होत असलेली व्याजदरवाढ आणि रशिया- यूक्रेन दरम्यान सुरू झालेले युद्ध या कारणामुळे गेल्या सहा महिन्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत आहेत.

मात्र असे असतानाच भारतातील रिटेल गुंतवणूकदारांनी या काळात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.


त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक जास्त कोसळले नाहीत. या बाबीची अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दखल घेतली आहे. परदेशी गुंतवणूकदार परत जात असताना किरकोळ गुंतवणूकदारांनी किल्ला लढवला असल्याचे त्यांनी सांगितले. रिटेल गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात शॉक अब्सॉर्बरची भूमिका अदा केली असल्याचे सीतारामन म्हणाल्या.


अर्थमंत्रालयाने आयोजित केलेल्या आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमात बोलताना सीतारामन यांनी सांगितले की, करोनाच्या काळातही शेअर बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले असताना भारतीय रिटेल गुंतवणूकदारांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर विश्वास दाखविला आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. त्यानंतर अमेरिकेत व्याजदर वाढ झाली. आगामी काळातही व्याजदर वाढ होणार आहे. त्याचबरोबर रशिया- युक्रेन युध्द शंभर दिवसापासून चालू आहे. या कारणामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतातून परत जात आहेत.


मात्र याच काळामध्ये भारतीय गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक काही प्रमाणात स्थिर असल्याचे दिसून येत आहे. या अगोदर परदेशी गुंतवणूक परत जात असताना भारतीय शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळत असत. मात्र करोनानंतर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक पूर्वीसारखे कोसळले नाहीत. हीे समाधानाची बाब आहे. सध्याच्या परिस्थितीत ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे त्यांना दीर्घ पल्ल्यात चांगला परतावा मिळू शकतो असे बोलले जाते. भारतात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या रिटेल गुंतवणूकदारांची संख्या सध्या सहा कोटीवर गेली असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या