कोविडमुळे रखडलेल्या लग्नकार्याचा पावसाळ्यात धुमधडाका

 


दोन वर्षे कोविडमुळे रखडलेल्या लग्नकार्याचा पावसाळ्यात धुमधडाका



पावसाळ्यात लग्नसराई नसते, असा समज यंदा खोडून काढला जात आहे. या वर्षी पावसाळ्यातही भरपूर लग्नसमारंभ होताना दिसत आहेत.

दोन वर्षे कोविडमुळे रखडलेली लग्नकार्ये आता 'शुभ' व 'काढीव मुहूर्ता'वर पार पडत आहेत. खऱ्या अर्थाने लगीन घाईचं वातावरण दिसतं आहे,' अशी माहिती विवाहकार्य संपन्न करणाऱ्या नितीन काळे गुरुजींनी दिली.


विवाह समारंभाच्या यंदाच्या मुहूर्तांबद्दल माहिती देताना काळे म्हणाले, 'मराठी माणसं दाते पंचांगानुसार मुहूर्त पाहण्यावर भर देतात. या पंचांगाप्रमाणे दरवर्षी गुढी पाडव्यापासून मंगलकार्ये सुरू होतात. यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या पाडव्यापासून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ५० मुख्य शुभ मुहूर्त आहेत. याशिवाय आपत्काल किंवा गौण मुहूर्त ४१ आहेत. यांना बोलीभाषेत काढीव मुहूर्त असंही म्हटलं जातं.


दोन्ही प्रकारचे मिळून ९१ मुहूर्त डिसेंबरपर्यंत आहेत. काहींचं लग्न कोविड काळात गर्दी टाळण्याच्या हेतूने पुढे ढकलले गेले. हा कालावधी अपेक्षेपेक्षा जास्त लांबल्याने आता ती मंडळी योग्य मुहूर्त साधून लग्न समारंभ करत आहेत.


काही जणांना नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशी जायचं असल्याने झटपट लग्न उरकून घ्यायचं असते, असे लोकही यंदाच्या मुहूर्तावर मंगलकार्याचा घाट घालत आहेत. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात लग्नकार्य होताना दिसत आहेत.'


कोविडकाळात मर्यादित उपस्थितांसमोर लग्नकार्ये पार पाडली गेली. काही मंगलकार्ये स्वतःच्या बंगल्यात, तर काही आपापल्या गृहरचना संस्थेच्या प्रांगणात झाली. काही समारंभ हॉटेलमध्ये झाले. मंगल कार्यालय व हॉटेलमधील लग्न समारंभात थोडा तपशिलाचा फरक जाणवला. मंगल कार्यालयात हवनविधीसाठी सुविधा उपलब्ध असते. हॉटेलमध्ये त्यासाठी परवानगी मिळेलच, याची खात्री नव्हती. आता न्यू नॉर्मल स्थितीचा फायदा करून घेत पुन्हा कार्यालयांमध्ये लग्न समारंभ करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

- नितीन काळे, गुरुजी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या