पिसर्वे गावातील दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
जेजुरी :
पिसर्वे (ता.पुरंदर) येथील सोमवारी (२७ जून) रात्री ११ वाजता लागलेल्या भीषण आगीत श्रद्धा जनरल स्टोअर्स आणि सोनू हेअर ड्रेसर्स ही दोन्ही दुकाने जळून खाक झाली.
गावातील ग्रामीण सुरक्षा यंत्रणेवरून दिलेल्या कॉलमुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच गावातील युवकांनी कैलास जांभले व मेघनाथ कोलते यांच्या टँकरच्या साहाय्याने पाणी आणून आग विझविण्याचे मदतकार्य सुरू ठेवले होते.
आगीची माहिती मिळताच जेजुरी आणि सासवड येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचत पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली.ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
अचानक लागलेल्या आगीमुळे दोन्ही दुकानांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रथमदर्शनी वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.
या आगीत रामदास कासवेद यांचे सोनू हेअर ड्रेसर्स आणि मनोहर शेंडकर यांच्या श्रद्धा जनरल स्टोअर्स दुकानासह दुकानातील लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. यात स्टेशनरी, प्लास्टिक वस्तू, शालेपयोगी साहित्य,फ्रिज यासारख्या वस्तू भस्मसात होऊन प्रचंड नुकसान झाले. सासवड पोलिसांशी संपर्क होऊ न शकल्याने शेवटी पुरंदर च्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सासवड पोलीस यंत्रणेला तात्काळ सूचना देत त्यांच्यामार्फत मदत उपलब्ध करून दिली. तसेच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
0 टिप्पण्या