बंडखोर आमदारांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा




 एकनाथ शिंदे सोबत बंडखोरी करून गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांना आता केंद्र सरकारची सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांपैकी काहींच्या कार्यालयांमध्ये तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे या आमदारांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारवर देखील आरोप केला जात होता. या पार्श्वभूमीवर आता या बंडखोर आमदारांपैकी जवळपास १५ आमदारांना केंद्र सरकराने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी पाटील, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयांमध्ये तोडफोडीच्या घडना समोर आल्या होत्या. शिवसेनेनं भाजपासोबत हातमिळवणी करून नैसर्गिक युती करावी आणि राज्यात सत्ता स्थापन करावी, अशी अट बंडखोर आमदारांच्या गटाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घालण्यात आली आहे.


काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्यानंतर या सगळ्या घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेने जात आहेत, याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच आता आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याचा निर्णय समोर आल्यामुळे त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या