गणवेशसाठी शाळांना साडेतेरा कोटींचा निधी

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यंदा पहिल्यांदाच सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तब्बल साडेतेरा कोटींचा निधी यासाठी शाळांना देण्यात येणार आहे.


दरवर्षी ठरावीक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्यामुळे हिरमुसलेल्या चेहर्‍यांवर यंदा आनंद फुलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळेच्या सर्व मुलींना तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिर्द्यरेषेखालील मुलांना मोफत गणवेश दिला जातो; ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आणि खुल्या प्रवर्गातील मुलांना मात्र गणवेश दिला जात नाही.


यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचासुध्दा समावेश आहे. अशा पध्दतीने बालपणीच मुलांच्या पुढे जातीच्या आधारावर भेदाभेद होत असेल, तर त्यांच्या मनात समतेचा भाव कसा निर्माण होईल? बालमनावर होणार्‍या या अमंगल संस्काराला रोखण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद व मनपाच्या तसेच शासनाच्या अनुदानावर चालणार्‍या सर्वच शाळांमधून सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्यावा, अशी मागणी काही आमदारांनी विधानसभेत केली होती.


त्यानुसार यंदा सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत राज्यात 2022-23 मध्ये 35 लाख 92 हजार 921 लाभार्थ्यांकरिता 215 कोटी 57 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील साडेनऊ कोटी रुपये पुणे जिल्ह्याच्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे समग्र शिक्षा योजनेत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी निधी पाठविण्यात आला आहे. परंतु, काही तांत्रिक कारणास्तव हा निधी शाळांपर्यंत अद्याप पोहचलेला नाही. तो शाळांना लवकरात लवकर कसा मिळेल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरच विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करणे शक्य आहे.
– संध्या गायकवाड,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या