३ जुलैला साधणार सत्तास्थापनेचा मुहूर्त!
- कोरोनामुक्त राज्यपाल ऍक्शन मोडमध्ये
- बहुमताच्या सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंच्या राजीनाम्याची शक्यता
- राजभवनात होणार फडणवीस-शिंदेंचा शपथविधी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण गेल्या आठ दिवसापासून अस्थिर बनले आहे. वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. शिंदे यांच्यासोबत पन्नास पेक्षा अधिक आमदार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याची चर्चा आहे.कोरोनामुक्त झालेले राज्यपाल कोश्यारी आता चांगलेच सक्रीय झाले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे नेतेही आता मैदानात उतरले आहेत. यामध्ये फडणवीस आघाडीवर आहेत.
भाजप आणि शिंदे गटाची सत्ता लवकरच राज्यात येण्याची चिन्हे आहेत. तत्पूर्वी बहुमताला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन सरकार बनविण्यासाठी राज्यपाला भाजपला बोलावतील. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी अमावस्या संपताच भाजपच्या गोटातील हालचाली अधिक गतीमान होतील. शिंदे अथवा प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणार असल्याचे समजते. यामुळे चार दिवसात सत्तांतराच्या हालचालींना गती येणार आहे.
भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ३ जुलै हा ठरला आहे. यादिवशी फडणवीस व शिंदे यांना राज्यपाल भवनात शपथ देण्यात येणार आहे. त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल. दरम्यान, या दोन तीन दिवसानंतर गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांना गोव्यात आणण्यात येणार आहे. तेथे एका हॉटेलमध्ये ४२ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकणातील एका नेत्याने पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात त्यांना गोव्यात आणण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या