ग्रामीण भागातही वाढला प्रभाव ; पालकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह
पाश्चिमात्य देशातून हळूहळू आपल्या देशात शहरातच नव्हे तर आता ग्रामीण भागातही पाय पसरलेल्या 'प्री-वेडिंग शूट'ने लग्नाआधी एक वेगळाच उत्साह संचारत आहे. प्री-वेडिंग शूट म्हणजे आपल्या सुखद आठवणींचा एक कधीही न विसरता येणारा कप्पा, अशी समजूत यामागे असली तरी ही फॅशन आता ग्रामीण भागातही चांगलीच रूळू पाहत आहे. आर्थिक स्थिती चांगली असलेले त्यासाठी सहज खर्च करतात. मात्र अलिकडेच या शूटप्रसंगी घडलेल्या प्रकारातून थेट लग्नच मोडल्याचा प्रसंग घडला आहे. त्यामुळे लग्नाआधी मुलामुलींना असे एकटे जाऊ द्यावे का? हा प्रश्न चर्चेला आला आहे. प्रत्येक पालकाने याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज समाजसेवींनी व्यक्त केली आहे.
बऱ्याच ठिकाणी विवाह सोहळ्याच्या प्रक्रियेतील लोक घरातील सजावट सुंदर दिसावी, म्हणून आपल्या घराच्या छोट्या हॉलमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक दिवे लावले. इव्हेंट मॅनेजमेंटवाले श्रीमंत लोकांना पैसे खर्च करण्यासाठी काही नवीन उपक्रम सुचवत असतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे प्री-वेडिंग फोटोशूट. लग्नासारख्या पवित्र सोहळ्यात पाश्चात्त्य संस्कृती प्रमाणे प्री वेडिंग शूटसारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वधू-वर आपल्या कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाआधी छायाचित्रकारांचा एक ग्रुप घेऊन सुंदर लोकेशनला फोटोशूट करून घेतात.
अनेक फोटो असे काढले जातात, की वधू आणि वर एकमेकांच्या मिठीत असतात. कधी कधी नववधू किमान (छोट्या) पोशाखात पण दिसतात. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नापूर्वी असा मोकळेपणा मान्य नाही. ही पाश्चात्य संस्कृती आहे असे काही लोकांची मानसिकता आहे. या फोटोशूटसाठी १ ते ५ लाख रुपये खर्च येतो. या फोटोशूटला परवानगी देणारे 'पैसे आमचे आहेत, मुलांच्या आनंदासाठी ५ लाख रुपये खर्च केले तर चुकीचे काय'? असा युक्तिवाद करतात. 'ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी हे फोटोशूट करू नये पण आमच्याकडे पैसा आहे, आम्हाला विरोध का' असे प्रश्न प्री विडिंगला परवानगी देणारे नव वधूवर पालक करत असतात.
मुलांच्या सुखासाठी माणूस सर्व काही करतो. पण कोणतीही घटना योग्य की अयोग्य, त्याचे समाजावर काय परिणाम होतात? हे पाहून ठरवले जाते. प्री-वेडिंग फोटोशूटमुळे अनेक विवाह तुटत असल्याचे ऐकले आहेत. मुलांच्या आनंदासाठी, ज्यांच्याकडे इतके पैसे नाहीत, ते कर्ज घेऊनही हे फोटोशूट करून घेत असतात. त्यामुळे लग्नाच्या खर्चाबाबत आधीच टेन्शनमध्ये जगणाऱ्या सर्वसामान्यांचा ताण वाढत आहे. लग्नात पूर्वीपासूनच इतके कार्यक्रम असतात, की ज्याच्या तयारीसाठी हळद कुंकूपासून ते पाहुण्यांच्या निरोपापर्यंत घरातील मंडळींना आजीची आठवण येते.
एकीकडे समाजसुधारक लग्नाचा खर्च कसा कमी करता येईल? याचा सखोल विचार करत आहेत. त्यासाठी लग्नात दिल्या जाणाऱ्या जेवणातील खाद्यपदार्थांची संख्या कमी करत आहेत. माना पानाचे रितीरिवाज कमी केले जात आहेत. लग्नात काटकसर करून मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना लग्नाच्या अनावश्यक खर्चाच्या तणावातून मुक्तता मिळत असते. विवाह पद्धतीला प्रोत्साहित केले जाते. दुसरीकडे एक वर्ग अशा चुकीच्या प्रथांना चालना देत आहेत. वधू- वर पालकानी यावर विचारमंथन करण्यास हरकत नाही, असेच म्हणावे लागेल.
-------------------
प्री-वेडिंग फोटोशूट करायचेच तर...
ग्रामीण भागातील मुला-मुलींचे आपल्या आई-वडील, भाऊ-बहिणी, आजी-आजोबांसोबत फोटो नसतात. प्री- वेडिंग शूट करायचेच असेल तर नवरदेव आणि नवरीने आपापल्या कुटुंबीयांसमवेत वेगवेगळ्या प्रसंगांचे फोटो शूट करावे. उदा. बहिणीला भाऊ गाडी शिकवताना, आई मुलीला स्वयंपाक करताना शिकवते, वडिलांना कामात मदत करताना, आजोबा अजींबरोबरचा निवांत क्षण, असे वेगवेगळे प्रसंग प्री वेडिंग शूट म्हणून आपण कॅमेऱ्यात कैद करू शकतो. त्याने संस्कृतीशी संबंधित प्रश्नही निर्माण होणार नाहीत.
- महिला पालक
0 टिप्पण्या