अहमदनगर : राज्यात राजकीय भूकंप झाला असला तरी अहमदनगर जिल्ह्यात राजकीय वादळे येण्यास सुरवात झाली आहे. अहमदनगर जिल्हा परिषद व 14 पंचायत समित्यांची अंतिम गट-गणरचना जाहीर झाली. त्यामुळे राजकीय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
जिल्हा परिषद गट-गणांच्या प्रारूप रचनेवरील हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम गट-गणरचना जाहीर करण्यात आली. यात प्रामुख्याने नगर व कोपरगाव तालुक्यांत काही प्रमाणात बदल करण्यात आले. उर्वरित तालुक्यांची प्रारूप रचनाच अंतिम करण्यात आली. यामध्ये पाथर्डी व अकोले तालुक्यांत पूर्वीप्रमाणेच गट व गण राहिले आहेत. उर्वरित तालुक्यांत एकेक गट वाढले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दोन जून रोजी जिल्ह्यातील 85 जिल्हा परिषद गट व 170 पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली. या रचनेवर हरकती मागविल्या होत्या. जिल्हाभरातून एकूण 65 हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुनावणी घेतली. हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम गट व गणांच्या रचनेस मंजुरी देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले.
त्यानुसार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुनावणीत 67 पैकी सात हरकतींना अंशत: मान्यता दिली, तसेच एक हरकत मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार काही गटांत दुरुस्ती करून अंतिम रचनेस आज मान्यता दिली.
असे झाले गट अन् गण
जिल्ह्यात एकूण 85 तर पंचायत समितीचे 170 गण आहेत. गट स्थापन होण्यासाठी 42 हजार तर गण स्थापनेसाठी 21 ते 22 हजार लोकसंख्येचा निकष निर्मितीसाठी लावला आहे.
हा झाला बदल
वडगाव गुप्ता, दहिगाव, साकत, निमगाव वाघा, शिराढोण, वाटेफळ, साकत ही प्रारूप आराखड्यातील गावे अंतिम आराखड्यात दुसऱ्या गटात टाकण्यात आली. वडगाव गुप्ता पूर्वी नवनागापूरमध्ये होते. आता वडगाव गुप्ताच गट झाला आहे. चिचोंडी गटात दहिगाव, साकत, शिराढोण, कोरेगाव ही गावे समाविष्ट झाली आहेत. निमगाव वाघा गाव देहरे गटातून वडगाव गुप्ता गटात गेले. कोपरगावातील चांदे कसारेचा गटाचा पोहेगाव गटात समावेश झाला. प्रारूपमध्ये चांदेकसारे गट होता. अंतिम आराखड्यात कोळपेवाडी गट झाला आहे.
हा लोकसंख्येचा निकष
पूर्वी गटासाठी 50 हजार लोकसंख्येची अट होती. या वेळी ती 42 हजारांची झाली आहे. गणासाठी आधी 25 हजार लोकसंख्येची अट होती. या वेळी गणासाठी 21 ते 22 हजार लोकसंख्या झाली आहे.
तालुकानिहाय गट (कंसात गण)
अकोले ः 6 (12), नगर ः 7 (14), राहुरी ः 6 (12), पारनेर ः 6 (12), श्रीगोंदे ः 7 (14), कर्जत ः 5 (10), जामखेड ः 3 (6), संगमनेर ः 10 (20), कोपरगाव ः 6 (12), श्रीरामपूर ः 5 (10), नेवासे ः 8 (16), राहाता ः 6 (12), शेवगाव ः 5 (10), पाथर्डी ः 5 (10).
नागरदेवळे जिल्हा परिषदेतच
गेल्या काही दिवसांपूर्वीच नगर तालुक्यात नागरदेवळे नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. यामध्ये नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळीचा समावेश करता आला. पूर्वी नागरदेवळे गट स्वतंत्र होता. मात्र, प्रभाग रचना सुरू असतानाच ही नगरपरिषद करण्यात आली. त्यामुळे नागरदेवळे गटाचा समावेश नगर परिषद ऐवजी जिल्हा परिषदेत झाला.
0 टिप्पण्या