सरकार पाडण्याच्या धास्तीने मंत्रालयात ही धावपळ

 सरकार पडण्याच्या धास्तीने मंत्रालयातील 


फाइल्स काढण्यासाठी धावपळ



 

शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्यात घडामोडींना वेग आलेला असताना पुण्यातील भांडवलदार, ठेकेदार, व्यावसायिक, उद्योजक यांचीही चिंता वाढली आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे स्पष्ट होत असल्याने प्रकल्प तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवरील मंत्रालयातील फाइल्स तसेच अन्य अर्ज याचे काम करून घेण्याकरीता गेल्या दोन दिवसांत पळापळ वाढली आहे.

शहरातील अनेक जण मुंबईच्या वाऱ्या करीत आहेत तर काही जण मंत्रालया शेजारीच मुक्कामी राहिले आहेत.


शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्‍यात आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. यापार्श्‍वभूमीवर मंत्रालयात प्रस्तावांच्या फाइलींवर सह्या होण्यासाठी संबंधीतांनी तळ ठोकला आहे. विशेष म्हणजे अशा फायलींवर सही होण्यासाठी कित्येक दिवस लागणार असताना सत्तांतर होणार असल्याने मंत्रालयात प्रस्तांच्या फाइलींवर सह्या घेणे, अर्ज निकाली काढणे, अशा कामांना गेल्या दोन दिवसांत मोठा वेग आला आहे. मंत्रालयातील कामांच्या मंजुरीसाठी टेबलांवर ढिगात फाइल्स पडून असल्याचे चित्र असतानाच आपल फाइल काढून त्यावर सही घेऊन ते फायनल करण्यासाठी संबंधीतांची धावपळ उडाली आहे. यातून प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणही वाढला आहे.


शिवसेनेतील पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीतील मंत्रीही चिंताक्रांत झाले आहेत. त्यामुळे प्रस्तावांच्या फाइल क्‍लिअर करण्याच्या कामाला वेग आला आहे. तसेच, मंत्री कार्यालयांतही धावपळ वाढली आहे. त्याचवेळी मंत्री कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही पुन्हा मूळ विभागात जावे लागू शकते म्हणून चिंता वाढली आहे. तसेच, काही विभागात तर कर्मचारी कित्येक तास थांबून फाइल्स क्‍लेअर करण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, बुधवार (दि.22) पासून मंत्रालयातील गर्दीत मोठी वाढ झाली आहे. तर काल देखील (दि.23) दिवसभर मंत्रालयातील अनेक विभागांमध्ये प्रचंड गर्दी होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या