अखेर देवेंद्रनीतीने महाविकास आघाडीला धक्का...

 


राज्यसभेच्या सहाव्या जागी सं'जय' नाही...  धनं'जय'...!


 राज्यसभा मतदानानंतर ८ तास लागून राहिलेली निकालाची उत्सुकता, मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामा, आक्षेपांमध्ये अडकलेली मतं, महाविकास आघाडीची वाढलेली धाकधूक... अशा वातावरणात शनिवारी (दि.11) पहाटे पावणे चारच्या आसपास महाराष्ट्रातील ६ जागांचा निकाल जाहीर झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले. फडणवीसांनी साम-दाम-दंड-भेद निती वापरुन तसेच अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांच्या साहाय्याने महाविकास आघाडीला दणका दिला. विजयासाठी आवश्यक संख्याबळ असतानाही योग्य नियोजनाने मविआच्या स्वप्नांना त्यांनी सुरुंग लावला.


 महाविकास आघाडीकडे विजयाचं आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले. ऐन निवडणूक काळात फडणवीसांना कोरोनाची बाधा झाली होती. पण त्यांनी शांततेच्या काळात अधिकचा घाम गाळला, त्याचं फळ भाजपला तिसऱ्या जागेच्या विजयी रुपात मिळालं. फडणवीसांचा चाणाक्षपणा, निवडणूक काळात आखलेले डावपेच, भाजपच्या सुयोग्य रणनितीच्या जोरावर तिन्ही जागांवर विजय मिळवला. भाजपने केलेल्या 'करेक्ट कार्यक्रमा'नंतर संजय राऊत यांनी काहीशी हताश प्रतिक्रिया दिली. "आमच्या सोबत असलेले अपक्ष आमदार फुटले, ते कोण फुटले हे आम्हाला माहिती आहे. पण त्यांना आमिषं दाखवण्यात आली. काहींना केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवण्यात आला", असा गंभीर आरोप निकालानंतर राऊतांनी भाजपवर केला.

 "आमच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार म्हणजेच पक्षाचे आमदार फुटले नाहीत तर काही अपक्ष आमदार, काही छोट्या पक्षाचे आमदार फुटले आहेत. त्यांना काही आमिषं दाखवण्यात आली. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील... पण आम्ही उद्या पाहू... निवडणुकीत असं होत असतं..." असं राऊत म्हणाले.

 आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब या सगळ्यांनी उत्तम व्यूव्हरचना केली होती, पण शेवटी आमची एक जागा निसटली. आम्ही मतांचा कोटा ज्याप्रमाणे ठरवला होता, त्यानुसारच सगळं काही झालं. आम्ही दुसऱ्या पसंतीची मतं घेतली नाहीत. त्यात माझं एक मत बाद झालं"

भाजपने जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानत नाही

"भारतीय जनता पक्षाने नक्कीच जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानायला तयार नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक ३३ मतं संजय पवारांना आहेत तर भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं आहेत. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे. पण भाजपचा दणदणीत विजय झाला, हे चित्र साफ झूट आहे. माझं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय?", असं संजय राऊत म्हणाले.

______________


फडणवीस यांनी चमत्कार केला...: पवार 


"अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलीशी करण्यात विरोधी फडणवीस यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. "महाविकास आघाडीच्या एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं. तिन्ही पक्षातील एक मतंही फुटलं नाही. जी मतं फुटली आहेत ती अपक्षांची आहेत. त्यांना जोडण्याचा फडणवीस यांनी चमत्कार केला", असं पवार म्हणाले.


_____________


कौन है ये मुन्ना?

अठरा वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात लढलेल्या धनंजय महाडिक यांचा उल्लेख शरद पवार यांनी कौन है ये मुन्ना? असा केला होता. याच मुन्नाला त्यांना राष्ट्रवादी पक्षात घेतले. याच पक्षाच्या चिन्हावर ते खासदार झाले. पण नंतर २०१९ च्या पराभवाने महाडिक यांनी या पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे महाडिक यांचा पराभव करण्यासाठी थेट शरद पवारांनी राज्यसभेच्या मतांची रणणिती आखली. तरीही महाडिक विजयी झाले.


_______________


सहा वर्षातील पराभवाची शृंखला खंडित...


लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, गोकुळ अशा अनेक निवडणुकीत महाडिक गटाला सहा वर्षात सतत पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेला धनंजय महाडिक, विधानसभेला अमल महाडिक, विधानपरिषदेला महादेवराव महाडिक, विधानसभेला सत्यजीत कदम यांना पराभवाचा धक्का बसला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत या गटाला माघार घ्यावी लागली. पंचवीस वर्षाची गोकुळ दूध संघातील सत्तेबरोबरच महापालिका, जिल्हा परिषद यावरीलही सत्ता गेली. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकीकडे पालकमंत्री सतेज पाटील यांचा विजयी वारू तर दुसरीकडे महाडिक गटाचा पराभव या शब्दाने धरलेला पिच्छा यामुळे महाडिक गटाची ताकद कमी होत होती. यामुळे या गटाला नव्याने उभारी मिळण्यासाठी एक मोठ्या विजयाची गरज होती. धनंजय महाडिक यांच्या राज्यसभेतील विजयाने ही उभारी मिळाली आहे. तर भाजपला पश्चिम महाराष्ट्रात मोठी ताकद मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या