रिमझिम पावसाच्या लहरी अंगावर झेलत संत तुकोबारायांची पालखी वरवंड मुक्कामी विसावली...!

 


चौफुला व वरवंड येथे दर्शनासाठी नागरिकांची झुंबड!

पाटस :  

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा यवत येथील मुक्काम आटोपल्यानंतर सकाळी पंढरीच्या वाटेवर टाळ मुदृगांच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करीत निघाली. सकाळी दौंड तालुक्यातील भांडगाव येथे  आरती घेण्यात आली. त्यानंतर पालखी ने पुणे-सोलापूर महामार्गावरुन लाखो भाविक भक्तांच्या भक्तिमय वातावरणात आणि सावलीचा खेळ खेळत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. हा भव्य दिव्य असा पालखी सोहळा वाखारीच्या आसपास आल्या नंतर रिमझिम पावसाचे आगमन झाले. चौफुला ते वरवंड पर्यंत रिमझिम पावसाच्या लहरी अंगावर झेलत पालखी वरवंड मुक्कामी विसावली, दरम्यान, पालखी चौफुला येथे दाखल होताच पालखीच्या दर्शनासाठी चौफुला - बोरीपार्धी, केडगाव, दापोडी, पारगाव पडवी,सुपा, मोरगाव या गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. लहानांपासून ते थोरांपर्यंत पालखीच्या स्वागतासाठी आणि दर्शन घेण्यासाठी तासनतास नागरिक चौफुला येथे वाट पाहत होते. तुकोबारायांचा हा पालखी सोहळा वरवंड येथे मुक्कामी दाखल झाला.दरम्यान, दौंड तालुका  प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, मोफत आरोग्य सेवा तर महामार्गावर अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, उद्योजक, व्यवसायिक व नागरिकांनी वारकरी भाविकांना भोजनांची, नाष्ट्याची व चहापाण्याची व्यवस्था ठीकठिकाणी केली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. वरवंड येथे आज पालखीचा मुक्काम असल्याने तुकोबारायांच्या पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली. स्वागत कक्ष व स्वागत कमान पालखी मार्गावर उभारल्या होत्या.तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी पालखी मार्गावर ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेत पर्यायी मार्गाने वाहतूक व्यवस्था पुणे ग्रामीण पोलिसांनी केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या