मतदार यादीत घोळ?

 



महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांमध्येही चुकीच्या पद्धतीने तोडफोड झाल्याचे समोर आले आहे. विशेषत: नव्याने समाविष्ट गावांसह शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक प्रभागांत काही उमेदवारांच्या हक्काचा मतदार भलत्याच प्रभागात जोडला गेल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून मतदार याद्यांमधील घोळ तातडीने दूर करण्याची मागणी पहिल्याच दिवशी जोर धरू लागली आहे.


महापालिका निवडणुकांसाठीची प्रभाग रचना आधीच अडचणीची झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला होता. मात्र, प्रभाग अनुकूल नसला तरी हक्काचा जास्तीत जास्त मतदार प्रभागात आल्यास निवडणुका सोप्या जातील तसेच तिकिटांवरही दावा सांगता येणार असल्याने अनेक इच्छुकांकडून प्रारूप मतदार याद्यांकडे लक्ष ठेवले होते. प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.


शिरूर मतदारसंघातील व पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेरील वढू या गावातील 1,500 पेक्षा जास्त मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक-2 मध्ये करण्यात आला आहे. अनेक प्रभागाच्या सीमेवरील मतदारांची विभागणी होण्याऐवजी प्रभागाच्या मध्य भागात असलेले मतदार दुसऱ्या प्रभागात टाकले आहेत. सर्वसाधारणपणे एका मतदारयादीत 1000 ते 1,200 मतदार आहेत. मात्र, या जाहीर झालेल्या याद्यांमध्ये काही प्रभागातील चार ते पाच याद्या दुसऱ्या प्रभागात तर काही प्रभागात चक्क 10 ते 15 याद्या शेजारच्या प्रभागात गेलेल्या आहेत. त्यात माजी नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 36 कर्वेनगर येथील सोसायट्यांमधील मतदार प्रभाग क्रमांक 16 फर्ग्युसन महाविद्यालय-एरंडवणे येथे जोडले आहेत. प्रभाग 17 शनिवार पेठ-नवी पेठेतील काही मतदार प्रभाग क्रमांक 52 सनसिटी-नांदेड सिटीमध्ये टाकले आहेत.


प्रत्यक्ष जागेवर तपासणी
पहिल्याच दिवशी मतदार यादीतील घोळ समोर येण्यास सुरूवात झाली असली, तरी या मतदारयाद्यांबाबत आक्षेप घेण्यासाठी महापालिकेने 1 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानुसार नागरिकतसेच इच्छुकांना क्षेत्रीय कार्यालय तसेच मुख्य निवडणूक कार्यालयासह ऑनलाइनही नोंदविता येणार आहेत. तर या हरकतींच्या पडताळणीसाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून 10 जणांचे स्वतंत्र पथक नेमण्यात येणार आहे. त्यानुसार आलेल्या हरकतींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन हे पथक तपासणी करणार असून त्यानुसार मतदार यादीत बदल केले जाणार असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या