सक्रिय करोना रूग्णांमध्ये पुणे राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

 


तुम्ही कितव्या क्रमांकावर आहे पहा...

पुणे- 

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत १ हजार ४२६ ने वाढ झाली आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार ५८३ झाली आहे. यामुळे सक्रिय कोरोना रुग्णांत पुणे राज्यात तिसऱ्या स्थानावर आले आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे यामध्ये मुंबई पहिल्या स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यात एकाच आठवड्यात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत ६६.११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.


राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी  राज्यातील जिल्हानिहाय सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. या अहवालात सध्या कोरोना रुग्णांच्या अनुक्रमे पहिले पाच जिल्हे, राज्यातील जिल्हानिहाय कोरोना रुग्ण, गेल्या आठवड्यातील (ता. १४ ते २० जून) जिल्हानिहाय कोरोना रुग्ण आणि चालू आठवड्यातील (ता. २१ ते २७ जून) जिल्हानिहाय रुग्णांची आकडेवारी देण्यात आली आहे.


पहिल्या तीन जिल्ह्यात ८२.५३ टक्के सक्रिय रुग्ण

सद्यःस्थितीत राज्यात एकूण २६ हजार ९३५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी राज्यातील सर्वाधिक संख्येनुसार पहिल्या पाच जिल्ह्यात मिळून २४ हजार ७८४ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी मुंबई, ठाणे आणि पुणे या पहिल्या तीन जिल्ह्यात मिळून २२ हजार २२६ रुग्ण आहेत. राज्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांच्या तुलनेत पहिल्या तीन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची टक्केवारी ही ८२.५३ टक्के इतकी आहे. सध्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी एकट्या मुंबईत ४६.३४ टक्के रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात २२.८९ टक्के तर, पुणे जिल्ह्यात १३.३० टक्के कोरोना रुग्ण आहेत.


पहिल्या पाच जिल्ह्यातील जिल्हानिहाय रुग्ण


मुंबई --- १२ हजार ४७९


ठाणे --- ६ हजार १६४


पुणे --- ३ हजार ५८३


रायगड --- १ हजार ८७३


पालघर --- ६८५


दहापेक्षा कमी रुग्णांचे तीन जिल्हे

दरम्यान, राज्यातील बीड, नंदूरबार आणि गोंदिया या तीन जिल्ह्यात प्रत्येकी दहापैकी कमी सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी नंदूरबार जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ चार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. गोंदिया जिल्ह्यात नऊ आणि बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या जिल्हानिहाय आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या