पुणतांबे येथे शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनास सुरुवात


राहाता :
दुधासह शेतीमालाला हमीभाव मिळण्यासह विविध मागण्यांसंदर्भात केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांनी आठ दिवसांची मुदत देऊनही त्यांनी याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पुणतांबे (ता. राहाता, जि. नगर)  येथील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनास आज, बुधवारपासून सुरुवात केली. दोन्ही सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी ‘एल्गार’ पुकारला असून, पुन्हा एकदा पुणतांबेकरांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, सरकारविरोधी शेतकऱ्यांच्या संघर्षांला सुरुवात झाली आहे

आंदोलनस्थळी प्रारंभी शेतकरी पुतळय़ाला मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक घालून आंदोलनाची मशाल पेटविण्यात आली.

या आंदोलनास राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. २३ मेच्या ग्रामसभेत १६ ठराव करण्यात येऊन याची प्रत तहसीलदारांना देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणतेही निर्णय व अंमलबजावणी न झाल्याने ‘किसान क्रांती’च्या पदाधिकाऱ्यांनी या  आंदोलनास सुरुवात केली. १ ते ५ जूनदरम्यान धरणे आंदोलन करण्यात येईल. त्याची शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ‘किसान क्रांती’च्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

पोलिसांची नोटीस

पुणतांबे येथे धरणे आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना राहाता पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी नोटिस बजावली आहे. करोना विषाणूचा आपण अथवा आपल्या समर्थकांकडून प्रसार झाल्यास प्रचलित कायद्यांचे उल्लंघन झाल्यास आपणाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्याद्वारे आंदोलनकर्त्यांना देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या