वारकऱ्यांना साठी पोलिस आयुक्त झाले वाढपी

 
ऐरवी कायद्याचा बडगा उगारत गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे काम पोलिस अधिकारी, कर्मचारी करतात.

अनेकदा इच्छा असूनही "ड्युटी फर्स्ट'मुळे घरच्या किंवा सार्वजनिक सणसमारंभामध्ये पोलिसांना कुटुंबासमवेत वेळ घालविणे शक्‍य होत नाही. त्यातही गणेशोत्सव, वारीचा बंदोबस्त पोलिसांसाठी सर्वाधिक तणावाचा काळ असतो. मात्र बुधवारी संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामीस्थळी पोचली. त्यानंतर गुरुवारी खुद्द पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कुटुंबासह दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिरातच वारकऱ्यांसमवेत महाप्रसाद घेतला. त्याचबरोबर वारकऱ्यांना स्वतः जेवण वाढून आपली आगळीवेगळी सेवा विठ्ठलाचरणी अर्पण केली.


कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच पालखी सोहळा निघाल्याने त्यामध्ये लाखो भाविक सहभागी झाले. हा पालखी सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी पुणे पोलिसांनीही सुक्ष्म नियोजन करीत कडक बंदोबस्तही ठेवला. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः लक्ष घालून पालखी सोहळ्याचा बंदोबस्त, वाहतुकीतील बदलांवर बारकाईने काम केले. पालखी मार्गाची पाहणी करुन सुधारणांबाबत सुचनाही केल्या. बुधवारी दोन्ही पालख्यांचे आगमन झाल्यानंतर रात्री पोलिसांच्या कडक बंदोबस्तात पालख्या मुक्कामीस्थळी पोचल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.


दरम्यान, गुरुवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, त्यांच्या पत्नी जुगनु गुप्ता, वडील डॉ. बद्रीप्रसाद गुप्ता वडील यांच्यासह कुटुंबाने भवानी पेठेतील संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जवळच्याच श्री स्वामी समर्थ मठामध्ये कुटुंबासह वारकऱ्यांसमवेत दुपारच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर पोलिस आयुक्त गुप्ता यांनी स्वतः वारकऱ्यांमध्ये सहभागी होत, त्यांना जेवण वाढत वारकरी व भाविकांची मने जिंकली. दरम्यान, गुप्ता यांनी रात्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचेही सहकुटुंब दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला. पोलिस आयुक्तांच्या साध्यासोप्या वागणुकीचे कौतुक करीत वारकरी व भाविकांनी त्यांना आशिर्वादही दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या