एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक शपथपत्रात गोलमाल





बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी विधानसभा निवडणुकांमध्ये दाखल केलेल्या शपथपत्रांमध्ये शेतजमीन, वाहने, मालमत्ता आणि शिक्षणाविषयीच्या माहितीमध्ये लपवाछपवी, तफावती आढळून आल्या आहेत.

यामुळे एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पुण्यातील प्रथमवर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.


अभिजित खेडकर, डॉ. अभिषेक हरिदास यांनी ऍड. समीर शेख यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 199, 200 लोकप्रतिनिधी कायदा कलम 125अ अंतर्गत ही याचिका दाखल केली आहे.


शिंदे यांनी 2009, 2014 आणि 2019 कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुका लढवताना शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबतच्या शपथपत्रांमध्ये तफावती आढळल्या आहेत. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.


शेत जमिनीचाही घोळ


2009 आणि 2014 च्या शपथपत्रांमध्ये शिंदे यांनी पत्नीकडे शेतजमीन नसल्याचे नमूद केले होते. मात्र, 2019 च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पत्नीने ठाणे जिह्यातील चिखलगाव येथे सर्वे नंबर 844,845 ही जमीन 6 ऑगस्ट 2009 मध्येच खरेदी केल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे शिंदे यांनी 2014, 2019 च्या शपथपत्रामध्ये व्यवसाय किंवा नोकरीच्या तपशिलात उत्पन्नाच्या स्रोतामध्ये शेतकरी असल्याचे नमूद केलेले नाही.


गाडय़ांच्या किंमतीत ते 10 लाखांची तफावत


एकनाथ शिंदे यांनी 2014 च्या शपथपत्रामध्ये आरमाडा गाडी 8 लाख रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. मात्र, 2019 च्या निवडणूक शपथपत्रामध्ये हीच आरमाडा 96 हजार 720 रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे.


2014 च्या निवडणूक शपथपत्रात शिंदे यांनी स्कॉर्पिओ 11 लाख रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे. मात्र, 2019च्या शपथपत्रामध्ये तीच गाडी अवघ्या 1 लाख 33 हजार रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे.


2014 च्या शपथपत्रात बोलेरो 6 लाख 96 हजार 370 रुपयांना, तर तीच गाडी 2019 च्या शपथपत्रात 1 लाख 89 हजार 750 रुपायंना खरेदी केल्याचे म्हटले आहे.


2014 च्या शपथपत्रक्षात एक टेम्पो 92 हजार 224 रुपयांना खरेदी केल्याचे, तर 2019 च्या शपथपत्रात तोच टेम्पो त्यांच्या पत्नीने 21 हजार 360 रुपायांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे.


2014 च्या शपथपत्रात इनोव्हा 17 लाख 70 हजार 150 रुपयांना खरेदी केल्याचे, तर 2019 च्या शपथपत्रामध्ये तीच गाडी त्यांच्या पत्नीने 6 लाख 42 हजार 230 रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे.


इमारत खरेदी केल्याची माहिती लपविली


शिंदे यांनी 2014 च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पत्नीकडे वाणिज्य इमारत नसल्याचे नमूद केले आहे . मात्र , 2019 च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पत्नीकडे ठाणे येथील वागळे इस्टेट येथे 007 प्लॉट नंबर बी 51 येथे वाणिज्य इमारत 20 नोव्हेंबर 2002 रोजीच खरेदी केल्याचे नमूद केले आहे . त्यामुळे शिंदे यांनी 2014 च्या शपथपत्रात ही इमारत खरेदी केल्याची माहिती लपविल्याचे स्पष्ट झाले आहे . शिंदे यांनी 2014 च्या शपथपत्रामध्ये हाऊस नंबर 5, लँडमार्क को . ऑ . हौ . सो . ली . फायनल प्लॉट नंबर 60 इस्टर्न एक्सप्रेस ठाणे ही निवासी इमारत 1 कोटी 6 लाख 27 हजार 815 रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे . तर , तीच इमारत 2019 च्या शपथपत्रामध्ये 1 कोटी 6 लाख 27 हजार 495 रुपयांना खरेदी केल्याचे नमूद आहे .


शिक्षण 11 वी पास पण शाळा वेगवेगळ्या


एकनाथ शिंदे 11वी उत्तीर्ण आहेत. मात्र, त्यातही शाळांची लपवाछपवी करण्यात आली आहे. 2009 च्या शपथपत्रामध्ये त्यांनी ठाण्यातील मंगला हायस्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेज येथून 1981 साली 11 वी उत्तीर्ण झाल्याचे नमूद केले आहे. तर, 2019 च्या शपथपत्रामध्ये शिंदे यांनी ठाण्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल येथून 1981 साली 11 वी उत्तीर्ण झाल्याचे नमूद केले आहे.


नोटरीच्या शिक्क्यात एक्स्पायरी डेट लपविली


शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात नोटरीच्या शिक्यात एक्सपायर डेट लपवल्याचे ही दिसत आहे. शिंदे यांनी 2014 च्या शपथपत्रात लता शिंदे यांचा स्थायी लेखा क्रमांक CGNPS4317R असा नमूद केला आहे. तर, 2019 च्या शपथपत्रात CGZPS4317R असा नमूद केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या