डाळ-तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटांची साडेतीन लाखांची उलाढाल

 


पुणे

मराठवाड्यातील उस्मानाबाद व पुणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दोन दिवसीय तांदूळ व डाळ महोत्सवात बचत गटांच्या मालाची तीन लाख ६० हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.

या महोत्सवात पुणे जिल्ह्यातील 11 तर, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच महिला बचत गट सहभागी झाले होते. पुण्यातील बचत गटांनी अस्सल सेंद्रीय इद्रायणी व हातसडीचा तांदूळ तर, उस्मानाबादच्या महिला बचत गटांनी गावरान डाळी विक्रीसाठी ठेवेल्या होत्या. उस्मानाबादच्या गावरान डाळींना पुणेकरांनी मोठी पसंती दाखविल्याचे पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालीनी कडू-धोटे यांनी सांगितले.


या महोत्सवात अस्सल इंद्रायणी, हातसडीचा आणि सेंद्रिय तांदूळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उडीद, मटकी, मूग, हरभरा, तूर आदी विविध प्रकारच्या सेंद्रिय डाळीचे स्टॉल महिला बचत गटांनी लावले होते. या महोत्सवाचे उदघाटन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी (ता.१०) उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पुणे आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या संयुक्त विद्यमाने या तांदूळ व डाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होती. यामुसार गुरुवारी (ता.९) आणि शुक्रवारी (ता.१०) रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या लष्कर भागातील मुख्यालयात हा आयोजित करण्यात आला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या