प्रत्येक महाविद्यालयामध्ये “स्वराज्य ध्वज’

 

पुढील वर्षीपासून प्रत्येक महाविद्यालयामध्ये “स्वराज्य ध्वज’ उभारणार पुढील वर्षीपासून प्रत्येक महाविद्यालयामध्ये “स्वराज्य ध्वज’ उभारला जाईल. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा ध्वज नाही. शिवरायांच्या या स्वराज्य ध्वजातून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.

याबद्दलचा शासकीय अध्यादेश लवकरच काढला जाईल, असे उच्च-तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. याशिवाय ज्याप्रमाणे रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. त्याप्रमाणे दरवर्षी विविध गड-किल्ल्यांवर सरकारतर्फे मोठे सोहळे साजरे केले जातील. आपण सर्वांनीच शिवरायांचा आणि त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यायला हवा, असे सामंत यांनी सांगितले.


शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एसएसपीएमएस’ येथील परिसरात 51 फूट उंचीची स्वराज्यगुढी उभारण्यात आली. उदय सामंत आणि उपस्थित माताभगिनी यांच्या हस्ते सोमवारी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी’, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या उपक्रमाचे हे 10 वे वर्ष आहे.


रणशिंगाची ललकारी, मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके,ढोलताशांचा गजर या वातावरणात येथे शिवजयंती महोत्सव समिती’तर्फे ही गुढी उभारण्यात आली. यावेळी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे, संदीप पाटील, सौजन्य निकम, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड आदी
उपस्थित होते.


शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक’ प्रारंभ करून राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता केला. रयतेची झोळी सुखसमृद्धी, स्वातंत्र्य, समतेने भरली. रयतेचे पालनपोषण करणारे सार्वभौम छत्रपती झाले. त्यामुळे आजही शिवरायांचे स्वराज्य हे भारतीयांच्या मनावर राज्य करते, असे सामंत म्हणाले.


अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळेच 6 जून शिवस्वराज्य दिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही 6 जून 2013 सालापासून हा दिवस साजरा करतो. पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यासह अनेक ठिकाणी स्वराज्य गुढी उभारली जाते. त्याचबरोबरीने यावर्षी 51 गडांवर तसेच पुण्यातील 101 गणेशोत्सव मंडळानीदेखील स्वराज्यगुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा केला, असे गायकवाड म्हणाले. रवींद्र कंक, समीर जाधवराव, किरण साळी, सचिन पायगुडे, निलेश जेधे, शंकर कडू, प्रवीण गायकवाड, गोपी पवार, सागर पवार, मयुरेश दळवी, किरण देसाई हे सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या