जेजुरी प्रतिनिधी
येळकोट येळकोट जयमल्हार चा जयघोष करीत पंढरीला निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जेजुरी नगरीमध्ये भंडारा उधळून (रविवारी) उत्साहात स्वागत करण्यात आले.सासवड (ता.पुरंदर) येथील नागरिकांचे दोन दिवसांचे आदरातिथ्य स्वीकारून आणि सासवडकरांचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा पुणे-पंढरपूर महामार्गाने मार्गस्थ होत संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाच्या श्री क्षेत्र जेजुरी नगरीत दाखल झाला.
जेजुरी नगरीत दाखल झालेल्या माऊलींच्या दर्शनासाठी जेजुरी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी जेजुरीकरांनी मनसोक्त भंडाऱ्याची मुक्त उधळण करत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केले.
यंदापासून जेजुरी मध्ये सुसज्ज सोयी सुविधांनी साकारलेल्या नवीन पालखीतळावर माऊलींच्या पालखीच्या मुक्कामाची पहिलीच वेळ आहे.
या नवीन पालखीतळावर प्रांत अधिकारी , तहसील कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली, सार्वजनिक बांधकाम विभाग, जेजुरी नगरपरिषद यांच्यामार्फत नियंत्रण कक्ष, विद्युत कक्ष आणि स्वागत कक्ष यांची निर्मिती करून , नवीन पालखी तळाचे सपाटीकरण, जवळच असलेल्या तलावाला केलेलं संरक्षण, तात्पुरत्या स्वरूपातील स्वच्छ्तागृहांची निर्मिती, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुविधा, अग्निशमन यंत्रणा आदि गोष्टींनी सोहळ्यासाठी उत्कृष्ठ सोयी सुविधा दिल्या गेल्या. तसेच पोलिस प्रशासन मार्फत देखील सोहळ्यासाठी उत्कृष्ठ चोख बंदोबस्त ठेवला गेला. कोरोनाच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेता या सोहळ्यामध्ये विविध सामाजिक संस्था, मंडळे,वेगवेगळे संघ यांच्या मार्फत मोफत अन्नदान, औषध वाटप आणि कोरोना विषयी जनजागृती देखील करण्यात आली.
कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या खडतर कालावधीनंतर यंदाची पायी वारी मोकळ्या वातावरणात होत आहे. राज्य सरकारने सर्व निर्बंध उठवत यंदा पालखी सोहळ्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे समस्त वैष्णवजणांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
0 टिप्पण्या