मेंदूच्या आरोग्याकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यास...
मेंदूच्या आरोग्याकडे योग्य लक्ष न दिल्यास कालांतराने तोही वृद्ध होऊ लागतो. त्यामुळे त्याचे विविध विकारांपासून संरक्षण करण्यासाठी, त्याची स्मृती व एकाग्रक्षमता सुधारण्याबरोबरच त्याला निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी विशिष्ट आहार घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
आहारतज्ज्ञांच्या मते कालौघात मेंदूला विविध प्रकारे सूक्ष्म इजा पोहोचलेली असते. त्याला रक्तपुरवठा कमी होऊ लागतो. काही घातक मुक्त घटक तयार होतात. त्यापासून विशिष्ट आहारामुळे मुक्ती मिळवता येते.
पारंपरिक पद्धतीने तयार केलेले ऑलिव्ह तेल मेंदूसाठी चांगले असते. त्यामुळे त्याच्या जुन्या पेशी हटवून नव्या पेशींच्या निर्मितीस चालना मिळते. जेणेकरून विस्मृती विकार (अल्झायमर) दूर राहण्यास मदत होते. 'अॅपल सायडर व्हिनेगर' आणि मोहरीचा सौम्य मसाला यांचे मिश्रण (सॉस) हे कच्ची फळे-भाज्या-कोशिंबिरीवर टाकून खाल्ल्यास ते मेंदूसाठी गुणकारी असते.
काही मसाले मेंदूसाठी नक्कीच चांगले असतात. हळद, काळी मिरी, दालचिनी, केशर, आले आणि रोझमेरीमुळे मेंदू निरोगी राहतो. स्मृतीसाठीही ते चांगले असतात. रावससारख्या माशांत आढळणारी 'ओमेगा ३' मेदाम्ले मेंदूसाठी लाभकारक असतात. त्यामुळे मेंदू तरुण राहतो. काही प्रकारची 'ओमेगा ३' मेदाम्ले कडधान्ये, काजू, बदाम, अक्रोड आदींत मिळतात. पालकसारख्या हिरव्या भाज्यांमधून ब जीवनसत्त्व किंवा 'फोलॅसिन' मिळते. ते वाढत्या वयात मेंदूच्या आकलनशक्तीला उपयोगी असते.
0 टिप्पण्या