आदित्य ठाकरे म्हणाले ‘खरे शिवसैनिक असाल तर…’: एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; आसामला ५१ लाखांची मदत जाहीर


एकीकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे आसाम चर्चेत असताना दुसरीकडे राज्याला पुराचा फटका बसला असल्याने मोठं संकट निर्माण झालं आहे. आसाममधील २१ लाख नागरिक अद्याप पुरात अडकले आहेत. पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १३४ वर पोहोचली आहे. त्यामुळे बंडाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आसामच्या पुराचाही उल्लेख होत आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी आसामसाठी ५१ लाखांची मदत जाहीर केली आहे.

एकनाथ शिंदेंचं ट्वीट

आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसंच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे.

आदित्य ठाकरेंनी केली होती टीका

“मुख्यमंत्र्यांनी केलेलं आवाहन आपण सर्वांनी ऐकलं असेलच. माझं अजूनही एवढंच मत आहे की, जे कुणी तिकडे गुवाहाटीत आहेत. माझी हीच अपेक्षा असेल ते खरोखर शिवसैनिक असतील तर त्यांनी गुवाहाटीत आजुबाजूला पूर आलेल्या स्थळी जावं आणि लोकांची सेवा करावी. एकीकडे आसाममध्ये पूर आला असताना, कोण एवढं मजा करायला लावतंय, मला माहीत नाही,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते.

आसाममध्ये पूरग्रस्त स्थिती असल्याने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही सत्ताधारी भाजपाविरोधात आंदोलन करत शिवसेना आमदारांना परत पाठवण्याची मागणी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या