प्रेमसंबंधात असताना गुलाबी क्षणांचे केलेले चित्रीकरण तरुणींना पडते महागात
पुणे-
प्रेमसंबंधात असताना गुलाबी क्षणांचे केलेले चित्रीकरण तरुणींना महागात पडत आहे. 'ब्रेकअप' झाल्यानंतर तरुणींना फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा लॉजवर येण्यासाठी भाग पाडले जात आहे.
मागील काही दिवसांपासून अशा प्रकारे ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे तरुणींनी प्रेमसंबंधात असतानाच खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरात राज्याच्या कानाकोपर्यातून आलेला कामगारवर्ग स्थायिक झाला आहे. त्यामुळे शहरातील एमआयडीसी परिसरात दिवसभर पुरुष आणि महिला कामगारांची रेलचेल पाहवयास मिळते.तसेच, आयटी हबमुळे शहरात तरुणांना नोकर्यांची मोठी संधी आहे.
त्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील तरुण शहराला पसंती देत आहेत. मात्र, अलीकडे बाहेरून कामासाठी आलेल्या या मंडळींची प्रेमप्रकरणे सोडवताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. अनेक प्रेमप्रकरणांत भांडणे झाल्यानंतर ब्लॅकमेलिंगचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने तरुणी भरडल्या जात आहेत. त्यामुळे प्रेमसंबंधात असलेल्या तरुणी व महिलांनी स्वतःवर काही बंधने लावून घेण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.
ब्रेकअपनंतर उगवला जातोय 'सूड'
ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराकडून तरुणीला भविष्यात लग्न ठरू न देण्याची धमकी दिली जाते. घरच्यांनी एखादे स्थळ पाहिल्यास प्रियकर तरुणीचे आक्षेपार्ह फोटो नातेवाईक व नवरदेव मुलाला पाठवतो. ज्यामुळे कित्येक तरुणींची ठरलेली लग्न मोडली असल्याचे पोलिस खासगीत सांगतात.
महिलांना एक चूक पडतेय महागात
विवाहित महिलादेखील प्रेमप्रकरणांमध्ये अडकत आहेत. वासनांध पुरुष लग्न, नोकरी यासारखे आमिष दाखवून आपला हेतू साध्य करून घेतात. दरम्यान, महिलेचे नको त्या अवस्थेत फोटो काढून, संबंधित महिलेचा गरजेपुरते वापर केला जातो. महिला यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. मात्र, नवर्याला सांगण्याची भीती दाखवून महिलेला पुन्हा जाळ्यात ओढतात.
तरुणाने महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिला लॉजवर नेले. तेथे नशेचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेचे व्हिडिओ तयार करण्यात आले. त्यानंतर तरुणाने महिलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने लॉजवर नेले. तिच्यावर सहा ते सात वेळा लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पंकज अनिल खंडागळे (38, रा. बेलठिकानगर, थेरगाव) याला अटक केली.
'तुझे लग्न ठरल्याचे मला माहीत झाले आहे. तुझे लग्न कसे होते तेच मी पाहतो. तुझ्या होणार्या नवर्याला आपल्याबाबत सांगून तुझे लग्न मोडतो. तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर आपले दोघांचे फोटो तुझ्या होणार्या नवर्याला पाठवून तुझी लाईफ बरबाद करतो', अशी धमकी एकाने तरुणीला दिली. त्यानंतर वारंवार तरुणीला फोन करून भेटण्यासाठी प्रवृत्त केले. याप्रकरणी पीडित तरुणीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वैभव रामचंद्र सोमवंशी (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रेमसंबंधात असलेल्या तरुणींनी काही बंधने पाळण्याची गरज आहे. लग्नाचे आमिष दाखवणार्या अनोळखी व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नये. तसेच, प्रेमसंबंधांबाबत स्वतःच्या आणि तरुणांच्या घरच्यांशी मनमोकळा संवाद ठेवावा. याव्यतिरिक्त विवाहित पुरुष व महिलांनी नैतिकतेचे भान ठेवण्याची गरज आहे. ज्यामुळे असे प्रकार आटोक्यात येतील.
-आनंद भोईटे, उपायुक्त, परिमंडळ दोन.
0 टिप्पण्या