जमिनींची परस्पर विक्री होत असल्यास : जमीन मालकाला येणार एसएमएस

 राज्यातील चार कोटी जमीनमालकांचे आता प्रोफायलिंग तयार करण्यात येणार


राज्यातील चार कोटी जमीनमालकांचे आता प्रोफायलिंग तयार करण्यात येणार आहे. या प्रोफाइलमध्ये जमीनमालकाचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी यांची माहिती असणार आहे.

त्यानंतर सातबारा उताऱ्याशी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी लिंक करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे. या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंद, बोजा आदींची माहिती खातेदाराला एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून समजणार आहे. तसेच जमिनींची परस्पर विक्री होत असल्यास ही बाब खातेदारांना एसएमएसच्या माध्यमातून समजणार असून, या माध्यमातून फसवणूक रोखणे शक्‍य होणार आहे.

गेल्या काही वर्षांत जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. परस्पर जमिनींचे व्यवहार करणे, बोगस कागदपत्रे सादर करून सातबारा उताऱ्यावर नावे दाखल करणे, बोजा चढविणे, वारस नोंद घालणे असे प्रकार होत आहेत. फसवणूक झाल्यानंतरच जमिनींच्या मालकाला याची माहिती कळते. असे प्रकार टाळण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीची माहिती संबंधित जमीन मालकाला समजण्यासाठी महसूल विभागाने सातबारा उताऱ्याशी मोबाईल क्रमांक लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशा प्रकारे मोबाईल लिंक करता येणार
सातबारा उताऱ्यावरील खातेदारांना त्यांचे मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी भूमिअभिलेख विभागाकडून संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. खातेदाराची माहिती पुराव्यांसह संबंधित तलाठी यांचेकडे प्राप्त झाल्यानंतर तलाठी ती तपासून डेटाबेसमध्ये साठविणार आहेत. यामुळे जमीन व्यवहारांच्या माहितीमध्ये परस्पर बदल होत असल्यास त्याची माहिती ई-मेल व मोबाईलवर उपलब्ध होईल.

सातबारा उताऱ्यावर नोंदींचा विलंब टळणार
एखाद्या व्यक्तीने जमीन खरेदी करण्याचा दस्त नोंदविल्यानंतर तो दस्त तलाठी कार्यालयाकडे आल्यानंतर तलाठी सातबारा उताऱ्यावरील इतर खातेदारांना नोटीस बजावतात. पोस्टाद्वारे नोटीस पाठविण्यात येत असल्याने ती मिळण्यास बरेचदा उशीर होतो. त्यामुळे १५ ते २० दिवसांत सातबारा उताऱ्यावर खरेदीदाराचे नाव येणे कायद्याने अपेक्षित आहे. मात्र यासाठी अनेकदा ४० ते ५० दिवस लागतात. एखादी व्यक्ती बाहेरच्या जिल्ह्यात अथवा परदेशात राहत असल्यास त्या व्यक्तीला नोटीस वेळेत पोचत नाही. आता फेरफार नोटिशीची माहिती एसएमएसच्या आधारे पाठविण्यात येणार असल्याने १५ ते २० दिवसांत खरेदीदाराचे नाव सातबारा उताऱ्यावर घेतले जाणार आहे.

चार कोटी खातेदारांचे मोबाईल नंबर घेणार
राज्यात अडीच कोटींहून अधिक सातबारा उतारे आहेत. तर चार कोटी खातेदार आहेत. प्रत्येक खातेदाराचे प्रोफाइल वेगळे असणार आहे. मोबाईल क्रमांक बदलल्यास अथवा नव्याने मोबाईल लिंक करण्यासाठी महाभूमी पोर्टलवर लवकरच एक लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या माध्यमातून सातबारा उताऱ्याला हे नंबर लिंक करणे शक्य होणार आहेत अथवा प्रत्यक्ष तलाठ्याची भेट घेऊनसुद्धा हे नंबर लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कोणत्याही खातेदाराची जमीन मिळकत पूर्णपणे सुरक्षित राहणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शासनाने सातबारा उताऱ्याशी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावरील प्रत्येक बदलाची माहिती एसएमएसच्या माध्यमातून संबंधित खातेदाराला उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे खातेदाराची फसवणूक होणार नाही.
- सरिता नरके, राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या