हवेच्या संपर्कात आल्यास कोरोनाचा धोका!

दीर्घकाळ हवेच्या प्रदूषणाच्या संपर्कात आल्यास कोरोनाचा गंभीर धोका उद्‍भवू शकतो, असे अनुमान जर्मनीतील अभ्यासात काढण्यात आले आहे. इटलीतील मिलान येथे गेल्या आठवड्यात 'युरोपियन सोसायटी ऑफ अनेस्थिशियोलॉजी अँड इन्टेन्सिव्ह केअर' या संस्थेच्या वार्षिक बैठकीत हे संशोधन सादर करण्यात आले.

नायट्रोजन डायऑक्साईड (एनओ २) वायूचे पातळी जास्त असणाऱ्या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यांना अति दक्षता विभागात (आयसीयू) आणि जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्याची गरज भासू शकते, असे या संशोधनात म्हटले आहे.

जीवाश्म इंधनाचे ज्वलन केल्यानंतर वातावरणात 'एनओ२' सोडला जातो. याच्या संपर्कात जास्त काळ आल्यास फुफ्फुसांसाठी तो हानीकारक ठरतो. श्‍वसनाद्वारे शरीरात गेलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तापर्यंत नेण्यात महत्त्वाचा भाग असलेल्या अंतस्थ पेशींचे (एंडोथेलियल पेशी) नुकसान होऊ शकते.'चॅरिटे - युनिव्हर्सिटीत्समेडिझिन बर्लिन' या वैद्यकीय विद्यापीठाच्या सुसेन कोच यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केले आहे. जर्मनीतील प्रत्येक काउंटीमधील 'एनओ२'ची वार्षिक पातळी मोजण्यासाठी त्यांनी २०१० ते २०१९ या काळातील हवेच्या प्रदूषणाची माहिती गोळा केली होती. ती ४.६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर ते ३२ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर अशी नोंदविली गेली. यातील सर्वाधिक पातळी फ्रँकफुर्ट येथे तर नीचांकी पातळी सुहलमध्ये होते. कोरोनाच्या जागतिक साथीपूर्वी दीर्घकाळी 'एनओ२'च्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाचा गंभीर धोका निर्माण झालेला असू शकतो, असे कोच म्हणाल्या.

प्रदूषणामुळे हृदयाचा झटका, अर्धांगवायू, दमा, फुफ्फुसाचा कर्करोग असे अनेक आजार होण्याची शक्यता असते. कोरोनाची साथ संपुष्टात आल्यानंतरही प्रदूषणामुळे आरोग्याचा धोका कायम राहू शकतो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या