अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगत रितेश देशमुख, म्हणाला “मामांसोबत…”


विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आज ४ जून रोजी अशोक सराफ ७५ वर्षांचे झाले आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘वेड’ आता ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. त्या निमित्ताने अशोक सराफ आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखशी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यावेळी त्यांनी एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

वेड या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहे. यावेळी अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना रितेश म्हणाला, “गेल्या २० वर्षांपासून मी सिनेसृष्टीत काम करतोय आणि अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नव्हती. जेव्हा ‘वेड’ चित्रपटाच्या लेखनाचे काम सुरु होते तेव्हा कुठे तरी वाटत होतं, या चित्रपटात अशोक मामांची भूमिका असावी म्हणजे जेणेकरून अशोक मामांसोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होईल. मी पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करतोय आणि त्यात अशोक मामा आहेत, हे सर्व स्वप्नवत आहे. अशोक मामांसोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता, मुळात त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे एखादा विनोदी सीन करतांना त्यांनी आपल्या अनुभवातून त्यात आवश्यक ते बदल करून त्यात जिव ओततात. एका दिग्दर्शकाला आपला लाडका अभिनेता, आपण लिहून दिलेल्या सिन पेक्षा जास्त आपल्या अभिनय कौशल्यातून देतो तेव्हा आणखी काय हवंय… आज अशोक मामांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मी त्यांना खूप खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना करतो.”

पुढे वयाच्या पंचाहत्तरीत सुद्धा त्यांचा उत्साह अफाट आहे वेड चित्रपटा संदर्भात त्यांना विचारले असता अशोक सराफ म्हणाले, “जेव्हा मला कळालं ‘वेड’ चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहे. तेव्हा कोणता ही पुढचा मागचा विचार न करता मी होकार दिला कारण माझ्या दृष्टीने हे महत्वाचे होते कि तो दिग्दर्शक बनतोय. रितेश एक टॅलेंटेड आर्टिस्ट आहेच त्यामुळे तो दिग्दर्शन करत असतांना मला देखील काही नवीन शिकता येईल हा माझा हेतू होता आणि खरं सांगतो या चित्रपटाचे शूटिंगचा मी इतका आनंद घेतलाय, धम्माल मजा केली. रितेश हा अतिशय शांत डोक्याने सेट वर काम करत होता, कुठे ही त्याने उत्साही असल्याते दाखवलं नाही. रितेशने प्रत्येक सिनवर विचारपूर्वक काम केलं आहे. असे शांत डोक्याने काम करणारे फार कमी दिग्दर्शक आहेत आणि मला वाटतं रितेशच्या रूपाने आपल्याला नवीन दिग्दर्शक मिळाला आहे. ‘वेड’ हा चित्रपट अतिशय उत्तम बनला आहे यात काहीच शंका नाही. आणखी एक बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे रितेशची वाइफ जिनिलिया मराठीत पदार्पण करत आहे. तिने पण मराठी समजून घेऊन उत्तम काम केले आहे. या सर्व अनुभवातून एकच सांगावेसे वाटते की माझ्या आयुष्यात एक चांगला चित्रपट केल्याचा फील मला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश म्हणून मला एक चांगला मित्र भेटला असं मी म्हणेल.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या