धक्कादायक : विजेच्या धक्क्याने दोन सख्या भावांचा मृत्यू
कर्जत : 

तालुक्यातील बेनवडी येथे पत्र्याच्या शेडला दुधाची अडकवलेली बादली काढताना उतरलेल्या विद्युत प्रवाहाने दोन सख्ये भाऊ अमोल हनुमंत धुमाळ (वय 21) आणि सचिन हनुमंत धुमाळ (वय 25) यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.

याबाबत प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि 28 रोजी सकाळी 7 च्या सुमारास सोमवारी रात्री गाईच्या धारा काढून दुधाची बादली पत्र्याच्या शेडला धुमाळ बंधूनी अडकवली होती. सकाळी सचिन ती बादली काढत असताना बादलीत उतरलेल्या विद्युत प्रवाहाने त्यास जोरदार धक्का बसला. त्याच्या मोठ्या आवाजाने मदतीसाठी अमोल हा त्या पत्र्याच्या शेडकडे धावला असता त्यास देखील विजेचा धक्का बसला.


थोड्याच वेळात दोघे ही निपचित पडल्याने त्यांना राशीनच्या दवाखान्यात नेले असता दोघांना ही वैद्यकीय अधिकार्‍यांने मृत घोषित केले. सदरची घटना बेनवडी आणि कर्जत तालुका परिसरात समजताच हळहळ व्यक्त करण्यात आली. दोघांवर सकाळी 10:30 वाजता बेनवडी शिवारात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दोन सख्या भावाच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


      पावसाळयात घरातील लाईटची वायरींग सुव्यवस्थित असणे आवश्यक आहे. तसेच वायर कुठे बाधित अथवा कट झाली असता ती तात्काळ बदलावी. अनावधावनाने व्यक्तीचा संपर्क विद्युत तारेशी झाल्यास त्यास कोरड्या लाकडी वस्तूने अथवा घरातील फायबर खुर्चीने त्यास ढकलत त्याचा विद्युत तारेशी असणारा संपर्क खंडीत करावा. संबंधित व्यक्तीस तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यात यावी निश्चित जीवितहानी टळू शकते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या