सर्वच पोलिस ठाण्यांत सध्या 'सासू' ची चांगलीच धास्ती

 


पुणे_

पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सर्वच पोलिस ठाण्यांत सध्या 'सासू' ची चांगलीच धास्ती आहे. काही पोलिस ठाण्यांनी तर वरिष्ठ अधिकार्‍यांचा कमी अन् या सासुचाच धसका जास्त घेतला आहे.

ही 'सासू' म्हणजे सामाजिक सुरक्षा विभाग. मागील काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून (सासू) अवैध धंद्यावर जोरदार कारवाई सुरू केली आहे. या विभागाने गेल्या दोन दिवसांत तीन ठिकाणी कारवायाकरून तब्बल ५३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.


शहरातील अवैध धंदे बोकाळू नयेत यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. मात्र असं असलं तरीही चोरीछुपे अवैध धंदे सुरू आहेत. त्यावर सामाजिक सुरक्षा विभाग (सासू) कारवाई करत आहे. या कारवाईचा अवैध धंदेवाल्यांसोबतच स्थानिक पोलीसांनी देखील धसका घेतला आहे. पण, धंदेवाले अन् स्थानिक पोलीस यांनी नशीबावर खेळ सुरू केले आहेत.


मागील दोन दिवसात फरासखाना, धनकवडी व के. के. मार्केट परिसरात सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाला शुक्रवार पेठेतील सीटी पोस्ट ऑफीसच्या पाठीमागील एका इमारतीच्या तळमजल्यावर तीन पत्त्याचा जुगार सुरू असल्याचे समजले. त्यानुसार रात्री छापा कारवाई केली. त्यावेळी १३ जणांना पकडण्यात आले. येथून ७७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसरी कारवाई सहकारनगर परिसरात केली असून, सावरकर चौकातील एका सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या फ्लॅटवर कल्याणचा ओपन मटका सुरू आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर याठिकाणी छापा टाकण्यात आला.


छाप्यात खेळणाऱ्या तब्बल १५ जणांना तसेच हा जुगार खेळविणाऱ्या ६ जणांना पकडले गेले आहे. एकूण २३ जणांवर सहकारगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरवेळी कारवाई करण्यात येत असलेल्या के. के. मार्केट परिसरात देखील सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली असून, के. के. मार्केट ट्रक टर्मिनल येथील एका गॅरेज पार्किंग कंपाऊंडमधील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटक्यावर छापा टाकला आहे. यावेळी कारवाई करत २३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या