मोठा गाजावाजा करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) मागच्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरु केली आहे.
मात्र, ही योजना केवळ कागदावरच असून मागच्या वर्षीचे अनुदान अद्यापही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. तसेच यंदाच्या वर्षासाठी अर्ज प्रक्रियाही सुरु झाली नसल्याने ही योजना सुरु होण्याआधीच बंद पडली की काय? असा सवाल पालकांनी उपस्थित केला.
समाजकल्याण खात्याचे न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मार्च २०२१मध्ये अनुसूचित जातीच्या (एससी) ज्या विद्यार्थ्याला दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले, त्यांना मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी सीईटी, जेईई आणि नीट परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे या परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन घेता यावे, यासाठी अकरावी आणि बारावीला प्रतिवर्षी एक लाख असे मिळून दोन वर्षांचे दोन लाख रुपयांचे आर्थिकसाह्य दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील सुमारे १० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यातून ४,५०० विद्यार्थी पात्र ठरले. त्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळाला नाही. बार्टीने या योजनेबाबत योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी पालक पल्लवी खरात यांनी केली आहे. याबाबत बार्टीच्या महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
काय आहेत तक्रारी ?
योजनेत दिलेल्या नियम अटीनुसार विद्यार्थी पात्र ठरत आहेत. मात्र, अद्यापही या योजनेची प्रक्रिया सुरु नाही
योजनेबाबत बार्टीला चौकशी केली असता, कोणतेही उत्तर दिले जात नाही
ही योजना सुरु आहे की बंद हे देखील कळण्यास मार्ग नाही
नव्या स्वरूपात येणार योजना?
या योजनेवर राज्य सरकारचे काम सुरु आहे. त्यामुळे अद्याप विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला नाही. ही योजना नव्या स्वरूपात येणार आहे. याबाबत समाज कल्याण विभागासोबत होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे, असे एका बार्टीच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
बार्टीच्या या अनुदान योजनेची जाहिरात दहावीच्या निकालानंतर सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, योजनाच बंद असल्याने निराशा झाली आहे. सीईटी, जेईई आणि नीट या परीक्षांसाठीच्या मार्गदर्शन वर्गाची फी आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे मुलांना इच्छा असूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे प्रवेश घेता येत नाही.
- मयूरी भोसले, पालक
या योजनेतून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार होते. त्यामुळे यातून कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा विभागाला टक्केवारी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळेच ही योजना सुरू होण्यापूर्वी बंद पाडण्याचा डाव आखला गेला आहे, अशी आमची खात्री आहे.
- कुलदीप आंबेकर, प्रमुख, स्टुडंट हेल्पिंग हॅंड संघटना
0 टिप्पण्या