Breaking News

डझनभर उपयोजनद्वारे कृषी विभागाचे कामकाज


औरंगाबाद :
भूवन, हॉर्टसॅट, क्रॉप सॅट, महा डीबीटी, पोखरा, क्रॉप कटिंग, ई-पीक पाहणी, कृषक अशा डझनभर उपयोजनद्वारे कृषी विभागाचे पेरणी ते खतांचा पुरवठा, कीड-रोगासंबंधीची माहिती देण्याचे कामकाज सध्या सुरू आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवरून कृषी सहायकांच्या माध्यमातून गावनिहाय पातळीवरही मार्गदर्शन, सल्ला देण्याचे काम होत असून ५० हजारांवर तंत्रस्नेही मोबाइलधारक शेतकऱ्यांना जोडण्यात आले आहेत.

सध्या खतांच्या विक्रीबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगानेही कृषी विभागाकडून ई-पॉज यंत्राद्वारे माहिती नोंद ठेवली जात आहे. क्रॉप सॅटच्या माध्यमातून कापूस, बाजरी, मूग, मका आदी पिकांच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी हे उपयोजन वापरतात. हे सर्व प्रत्यक्ष दिलेल्या क्षेत्राची (प्लॉटची) पाहणी करतात. त्याचे निरीक्षण नोंदवतात. कुठली कीड, रोग, त्याच्या प्रकाराची माहिती दिली जाते. हॉर्टसॅपमध्ये मोसंबी, डाळिंब, टोमॅटो, आंबा आदी फळपिकांबाबतची नोंदणी, कीड रोग सर्वेक्षण सल्ला व मार्गदर्शन अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी वैज्ञानिकांचा थेट सल्ला, मार्गदर्शन दिले जाते. याची माहिती थेट मोबाईल फोनवरून दिली जाते.

कृषक उपयोजनद्वारे खत किती टाकणे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे अन्य खताचे मिश्रण केले तर पिकांना फायदा होतो, याची माहिती दिली जाते. केंद्राकडील विविध योजनांची माहिती सांगणारे, मार्गदर्शनसह वेगवेगळय़ा खात्यांच्या योजना, संबंधित योजनांचा दुबार वापर लाभ घेतला जाणार नाही, याची माहिती देण्याचे काम भुवन उपयोजनद्वारे केले जात आहे.

कृषी विभागाचे कामकाज आता तंत्रस्नेही पद्धतीने सुरू आहे. मोबाईल फोनधारक ५० हजार शेतकरीही नोंदणी झालेले आहे. कीड-रोग नियंत्रणासह पेरणी आदींबाबतचा थेट सल्ला, मार्गदर्शन उपयोजनद्वारेच दिला जात आहे.

Post a Comment

0 Comments