बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण खूनप्रकरणातील एकाला जामीन मंजूर
श्रीरामपूर
बेलापूरचे व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांच्या अपहरण व खून प्रकरणातील एका आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ३० हजार रुपये जातमुचलक्याच्या व इतर अटीशर्तीसह जामीन मंजूर केला आहे.
व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (दि. १ मार्च) २०२१ रोजी आपल्या बेलापूर येथील दुकानावरून घरी परत न आल्यामुळे त्यांच्या भावाने पोलिसात तक्रार दिली होती. दि. ७ मार्च २०२१ रोजी त्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत श्रीरामपूर ते वाकडी रोडलगत संशयास्पद परिस्थितीत आढळून आला होता.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना बराच कालावधी लागला. शेवटी एका सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. या माध्यमातून
पोलिसांनी सदरील गुन्ह्यांमध्ये १५ आरोपींना अटक केली. सर्व आरोपींनी गौतम हिरण यांचे अपहरण केले व त्यानंतर छऱ्याच्या बंदुकीचा बट डोक्यात मारून त्यांचा खून केला व त्यांना रोडलगत फेकून दिला. या गुन्ह्याच्या तपासाअंती पोलिसांनी आरोपी चव्हाण, नवनाथ निकम, आकाश खाडे, संदिप हांडे, जुनेद शेख यांच्याविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.
आरोपी नवनाथ धोंडू निकम याने अँड. गोविंद एम. शर्मा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर दोन्ही पक्षाचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांनी आरोपी नवनाथ धोंडू निकम याला ३० हजारांच्या जातमुचलक्यावर अटी-शर्तीसह जामीन मंजूर केला आहे.
0 टिप्पण्या