विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास मिळणार एवढी रक्कम.....

 राज्य सरकारकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत सुधारणाराज्य सरकारने राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आता प्रत्येकी दीड लाख रुपये मिळणार आहेत.

यामुळे विद्यार्थी अपघात विमा योजनेच्या रकमेत दुपटीने वाढ झाली आहे. या विमा योजनेसाठी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी पात्र आहेत. याआधी अपघाती मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यास कुटुंबास प्रत्येकी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत असे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून सांगण्यात आले.


राज्य सरकारने ही रक्कम वाढविण्यासाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यात २१ जून २०२२ पासून ही सुधारित योजना सुरू कऱण्यात आली आहे. वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप, या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून सरकारने ही सुधारित योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास, संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांपैकी आई, आई हयात नसल्यास वडील किंवा विद्यार्थ्यांचे आई-वडील हयात नसल्यास १८ वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण आदींपैकी एकाला हे अनुदान दिले जाते.


या योजनेमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणे, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू किंवा मोटार शर्यतीतील अपघाताने मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास विमा अनुदानाची रक्कम दिली जात नाही. या विमा योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड आणि सुनंदा वाखारे (माध्यमिक) यांचा समावेश असणार आहे.सुधारित योजनेअंतर्गत मिळणारी विमा रक्कम (रुपयांत)


-विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास --- १ लाख ५० हजार.


-अपघातामुळे विद्यार्थ्याला कायमचे अपंगत्व आल्यास --- १ लाख


-कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा एक डोळा) --- ७५ हजार.


-अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास --- प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा कमाल १ लाख.


-सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास --- १ लाख ५० हजार.


-कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास --- प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा कमाल १ लाख.


राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत राज्य सरकारने यंदा सुधारणा केली आहे. या सुधारणेमुळे विमा रकमेच्या अनुदानात दुपटीने वाढ झाली आहे. या सुधारित विमा योजनेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आता प्रत्येकी दीड लाख रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा सुधारित अध्यादेश हा २१ जून २०२२ ला प्रसिद्ध केला आहे.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या