वारीत यंदा प्रथमच 'कॅराव्हॅन' चा वापर

 यंदा प्रथमच 'कॅराव्हॅन' चा वापर करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. वारीचे प्रत्यक्ष रस्त्यावरील संपूर्ण नियोजन व समन्वय त्यांच्याकडे असेल. पालखी सोहळय़ासाठी जिल्हा परिषदेकडील सहा विभागांसाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे. अशी माहिती

आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दिली.

पालखी सोहळय़ासाठी पुणे जिल्ह्याच्या हद्दीत 'प्रशासन ऑन व्हील' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार पर्यटन विभागाच्या 'कॅराव्हॅन'चा वापर करण्यात येत आहे.

यात दहा अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्याद्वारे वारीचे नियोजन व समन्वय करण्यात येत आहे.


पालखी सोहळय़ात वारीच्या नियोजन आणि समन्वयासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज संस्थानांचे कार्यालय मोबाइल अर्थात व्हॅनवर तसेच इतर गाडय़ांमध्ये असते. त्यामुळे आकस्मिक परिस्थिती, इतर विभागांसोबत नियोजन करणे सोयीचे होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनालाही सोयीचे व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी एक फिरते कार्यालय असावे, अशी संकल्पना मांडली. त्यानुसार पर्यटन विभागाच्या 'कॅराव्हॅन'चा वापर करण्यात येत आहे. ही एक मिनी बस असून त्यात आठ ते दहा लोकांसाठी बैठकीची व्यवस्था आहे. तसेच व्हॅनमध्ये मोबाइल संपर्क उत्तम असतो. पालखी सोहळय़ात लाखो मोबाइल कार्यरत असल्याने 'नेटवर्क'अभावी ते लागत नाहीत. मात्र, या व्हॅनमुळे संवादासाठी 'नेटवर्क' चांगले उपलब्ध होते. त्याचा फायदा आपत्कालीन तसेच इतर महत्त्वाच्या संदेशांसाठी केला जात आहे. हे वाहन जिल्हा हद्द असलेल्या निरा गावापर्यंत वापरले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठरवून दिलेल्या दरानुसार पर्यटन विभागाला भाडे देणार आहे.


वारकऱ्यांच्या पाण्यासाठी प्रत्येक ५०० मीटरवर टँकर ठेवण्यात आले असून त्यासाठी विहिरींचे प्रत्येक गावात अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरींसाठी महावितरणकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येत आहे. घाटावर टँकरची संख्या जास्त ठेवण्यात आली आहे. यंदा शौचालयांची संख्या दीडपट जास्त ठेवण्यात आली आहे. पालखी मुक्कामासह वारी मार्गावरही शौचालये असून त्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना प्रत्येकी ८४ लाखांचा निधी देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या