श्रीलंकन क्रिकेटचे भविष्य जय शाहांच्या हातात! जाणून घ्या काय आहे प्रकरण


भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेमध्ये सध्या राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. याशिवाय देश भयंकर मोठ्या आर्थिक संकटातून जात असून सर्वत्र अशांतता निर्माण झाली. यामुळे श्रीलंका क्रिकेट मंडळाचे (एसएलसी) मोठे नुकसान होऊ शकते. कारण, आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी एसएलसी उत्सुक आहे. मात्र, तेथील सर्वांगीण स्थिती बघता त्यांना ही संधी मिळेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे. जर श्रीलंकेने यजमानपद गमावले तर त्याचे पाच ते सहा दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. यजमानपदाबाबत आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) निर्णय घेणार आहे आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह हे एसीसीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे श्रीलंकन क्रिकेटचे भविष्य सध्या जय शाह यांच्या हाती असल्याचे म्हटले जात आहे.

२७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान आशिया चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यापूर्वी पात्रता स्पर्धाही होणार आहे. पात्रता स्पर्धा २० ऑगस्टपासून खेळवली जाईल. त्यातून स्पर्धेतील सहावा संघ निवडला जाईल. आयसीसीचे सदस्य असलेले भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे थेट मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक तयार झाले असले तरी यजमानपद कुणाकडे द्यायचे, याबाबत अनिश्चितता आहे.

सध्या श्रीलंकन क्रिकेड मंडळ ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. एसएलसीचे सचिन मोहन डिसिल्वा इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, “आशिया चषकाच्या यजमानपदाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका कशी आयोजित करतो यावर एसीसीचा निर्णय अवलंबून आहे. जय शाह आणि इतर एसीसी अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, जर सर्व काही सुरळीत पार पडले तर आशिया चषक आयोजित करण्याची संधी श्रीलंकेलाच मिळेल.”

डिसिल्वा पुढे म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांचे यजमानपद भूषवल्यास मोठ्या प्रमाणात कमाई होते. त्यामुळे आम्ही श्रीलंकेत खेळण्यासाठी या देशांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत. या स्पर्धेतून मिळणारा महसूल आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे.”

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची १९ मार्च २०२२ रोजी पुन्हा एसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोलंबो येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आशिया चषकाशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये जय शाह यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या