ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णात सातत्याने वाढ

 ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढ



पुणेकरांनो, स्वतःची प्रकृती सांभाळा. कारण शहरात पुन्हा ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

यातील बहुतांश रुग्णांना कोरोनानिदान होत नाही, हे दिलासादायक आहे. मात्र, आता परत मास्कचा वापर करा, गर्दीत जाणे टाळा आणि ताप आल्यास तातडीने उपचार घ्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, शहरात गेल्या मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत सौम्य वाढ झाल्याचे दिसून येत आहे.


शहरात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे सर्व निर्बंध हटविण्यात आले असून व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सौम्य वाढ होत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदविले आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना पुण्यात नेमकी काय स्थिती आहे, हे जाणून घेतले.


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यात रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा वाढणार नाही, याची खबरदारी नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. घरातून बाहेर पडताना प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्याचे टाळा. ताप आल्यास तो अंगावर काढू नका. तातडीने जवळच्या डॉक्टरांना दाखवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणात वाढ नाही. कोरोना विषाणूंमध्ये बदल झाल्याने काही रुग्ण आढळत आहेत. पण त्यातून रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका


सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सामान्य औषधांच्या वापरातून आणि पुरेशी विश्रांती घेऊन रुग्ण खडखडीत बरा होत आहे. मात्र, मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब अशा रुग्णांनी प्रकर्षाने काळजी घ्यावी.

- डॉ. मुकुंद पेनुरकर, संजीवन रुग्णालय



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या