जीएसटी संकलनात सोळा टक्क्यांनी घट

 वस्तू व सेवा कर संकलणात घट
राज्यासह देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात मे महिन्यात घट नोंदविण्यात आली़ राज्यात मे महिन्यात २०,३१३ कोटींचे संकलन झाले असून, एप्रिलच्या तुलनेत ते २५ टक्के कमी आह़े देशात या महिन्यात जीएसटी संकलनाने १.४० लाख कोटींच्या पुढे मजल मारली असली तरी एप्रिलच्या तुलनेत त्यात १६ टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आह़े

देशात चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाने नवा विक्रम करत प्रथमच दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

एप्रिल २०२२ मध्ये देशभरात एकूण १ लाख ६७ हजार ५४० कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून गोळा झाला होता. त्या तुलनेत मे महिन्यात जीएसटी संकलन १६ टक्क्यांनी आटले आहे. मात्र, आर्थिक वर्षांतील पहिल्या महिन्याच्या तुलनेत दुसऱ्या महिन्यातील संकलन नेहमी कमीच असते, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी मासिक संकलनाची आकडेवारी जाहीर करताना सांगितले. गेल्या सलग ११ महिन्यांत जीएसटी संकलनाने मासिक एक लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.

राज्यात मे महिन्यात २०,३१३ कोटींचे जीएसटी संकलन झाले. एप्रिल महिन्यात राज्यात २७,४९५ कोटींचे संकलन झाले होते. त्या तुलनेत राज्यातील संकलनात सुमारे २५ टक्क्यांनी घट झाली.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राज्यात २२ हजार कोटींचे संकलन झाले तर मे महिन्यात १३,३९९ कोटींचे संकलन झाले होते. अर्थात तेव्हा करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्बंध लागू करण्यात आले होते. २०२१च्या मे महिन्यातील संकलनाच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यातील संकलनात मात्र ५० टक्क्यांची वाढ झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या