जाणून घ्या महाराष्ट्रात कधी होणार मान्सूनचे आगमन

पावसा ऐवजी उन्हाच्या चटका
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील बहुतांश नागरिकांना उन्हाच्या चटक्यांना सहन करावे लागत आहे. र्नैऋत्य मोसमी पावसाच्या अरबी समुद्रातील शाखेच्या प्रवासास पोषक वातावरण नसल्याने त्याच्या महाराष्ट्रातील प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे.


गेल्या तीन दिवसांपासून मोसमी पाऊस कर्नाटकच्या कारवापर्यंत येऊन थबकला आहे. मोसमी पावसाच्या बंगालच्या उपसागरातील शाखा मात्र वेगाने प्रगती करीत आहे. शुक्रवारी  या भागात पूर्वोत्तर राज्यांमध्ये प्रवेश करून पावसाने थेट हिमालयाच्या पायथ्यापर्यंत मजल मारली. उत्तरेकडून येणाऱ्या कोरडय़ा, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी सध्या उष्णतेची लाट असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाने २९ मे रोजी केरळात प्रवेश केला. त्यानंतर ३१ मे रोजी त्याने कर्नाटकच्या कारवापर्यंत धडक दिली. गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळे दोन दिवसांत मोसमी पाऊस केरळमध्ये पोहोचेल, असे हवामान विभागाचे भाकीत असताना हवामानात अचानक बदल झाला. वाऱ्यांचा वेग काहीसा मंदावल्याने मोसमी पावसाच्या प्रवासासाठी स्थिती प्रतिकूल झाली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मोसमी पावसाची आगेकूच होऊ शकली नाही. बंगालच्या उपसागराच्या बाजूने मात्र मोसमी पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे. गेल्या तीन दिवसांत त्याने बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात प्रवेश करीत त्याने पश्चिम बंगालच्या काही भागासह आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश पादाक्रांत केला.

मोसमी पावसाच्या प्रवेशाने सध्या पूर्वोत्तर राज्यांसह पश्चिम बंगालमध्ये जोरदार पाऊस होत आहे. पुढील पाच दिवस या भागात पावसाची शक्यता आहे. मेघालयात अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्ययुक्त वाऱ्यांमुळे कर्नाटक, केरळ, लक्षद्विप, तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागातही पाच दिवस पाऊस होणार आहे.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती असली, तरी तुरळक भागातच हलका पूर्वमोसमी पाऊस होणार आहे. कोकणात पावसाचा जोर काही प्रमाणात घटणार आहे. मात्र, उर्वरित राज्यामध्ये ६ जूनपासून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उत्तरेकडील राज्य आणि मध्य भारतात मात्र कमाल तापमानात वाढ होऊन काही भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. विदर्भात आणखी दोन दिवस तापमानाचा पारा अधिक असेल. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणाचा दक्षिण भाग येथे उष्णतेची लाट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या