सख्ख्या भावाकडून नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर खुनी हल्ला !
केज तहसील कार्यालयात थरार; वाघ यांची प्रकृती गंभीर; आरोपी जेरबंद
केज तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावाने कोयत्याने मानेवर व डोक्यात वार केले. केज तहसिल कार्यालयातच सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हा थरार घडला. जखमी नायब तहसीलदार आशा वाघ यांची प्रकृती गंभीर आहे.
नायब तहसीलदार आशा वाघ यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ यांचे आपसात कौटुंबिक कलहातून आणि शेतीच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यात दि. ६ जून रोजी सकाळी ११:३० वा. मधुकर वाघ (वय ४५ वर्ष रा. दोनडिगर ता. चाळीसगाव जि. जळगाव) याने केज तहसिल कार्यालयात त्या अस्थापना विभागात काम करीत बसलेल्या असताना त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने आशा वाघ या घाबरल्या आणि त्यांनी जीव वाचविण्यासाठी शेजारी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात पळाल्या. तहसील कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी हल्लेखोर भावाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले.
दरम्यान आशा वाघ यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंबाजोगाई येथे हलविले आहे. पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे हलविले असल्याची माहिती आहे.
0 टिप्पण्या