मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह 16 आमदारांचे भवितव्य आज निकाल विरोधात गेला तर सरकार पडेल काय?

 


मुंबई: 


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांची आमदारकी जाणार की राहणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. जरी या 16 बंडखोरांच्या आमदारकीवर गदा आली तरी शिंदे - फडणवीस सरकारला मात्र तितकासा धोका नसून सरकार सेफ असल्याचं चित्र आहे.

शिवसेनेतून बंड करणाऱ्या, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या 16 आमदारांना अपात्र करा असं पत्र शिवसेनेच्या वतीनं विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आलं होतं. त्यावर या आमदारांनी 48 तासांच्या आत उत्तर द्यावं अशी नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जारी केली होती. पण या नोटिशीला उत्तर न देता या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असल्याचं न्यायालयाला सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाने त्यावर राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली. त्यांना पाच दिवसात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर या 16 आमदारांच्या अपात्रतेवर 11 जुलै रोजी निर्णय घेण्यात येईल असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशानंतर राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आणि भाजपने सक्रिय होत राज्यपालांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात यावेत असं पत्र भापजकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आलं. राज्यपालांनीही रातोरात पत्र जारी करत उद्धव ठाकरे यांना तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले.

उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध न करता आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोरांच्या आमदारकीचे भवितव्य हे सोमवारी, 11 जुलै रोजी लागण्याची शक्यता आहे.



अपात्रतेची टांगती तलवार असलेले हे 16 आमदार कोण?
एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे , चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे.



सरकारचं काय होणार?
सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली आणि जर या 16 आमदारांना अपात्र ठरवलं तरीही सद्य स्थितीत सरकारला कोणताही धोका नाही. शिंदे सरकारकडे सध्या 164 इतकं बहुमत असून त्यापैकी 16 आमदार जरी अपात्र ठरले तरी ही संख्या 148 इतकी होईल. विधानसभेतील बहुमत हे 145 इतकं आहे. त्यामुळे सरकार एकदम सेफ आहे.

एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार?
शिवसेनेने ज्या 16 आमदारांवर कारवाई करा असं पत्र दिलं आहे त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. एखाद्या वेळी एकनाथ शिंदे यांची आमदारकी अपात्र जरी ठरवली तरी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी कोणत्याही सभागृहाचा सदस्य असणं किंवा आमदार असणं आवश्यक नाही. पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यामध्ये त्यांना दोन्हीपैकी एका सभागृहात निवडून येणं गरजेचं आहे असा नियम आहे. त्यामुळे जरी एकनाथ शिंदे यांची आमदारकी गेली तरी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नाही. ते पुढच्या सहा महिन्यामध्ये निवडून येऊ शकतात, तशी मुभा त्यांना मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या