विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील पहिलीच कारवाई
औरंगाबाद : ६७ कोटी रुपयांची बनावट देयके करून १२ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर चुकवेगिरी करणाऱ्या भंगार व्यवसायातील दोन व्यापाऱ्यांना वस्तू व सेवा कर कायद्यान्वये अटक करण्यात आली. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एस. आर. मेटल्सचे समीर चौधरी व डोअर वल्र्डचे मनोज व्यास अशी या दोन व्यापाऱ्यांची नावे असून त्यांच्याकडून अनुक्रमे सहा कोटी व ५.९७ कोटी रुपयांची करचोरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समोर आली आहे. वस्तू व सेवा कर विभागाचे सहआयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मराठवाडा, विदर्भ व खान्देशातील अशा प्रकारची ही पहिली कारवाई असल्याचा राज्य वस्तू सेवा कर विभागाचा दावा आहे. पाच कोटी व त्यापेक्षा अधिक वस्तू सेवा कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यास अटक करण्याची तरतूद वस्तू व सेवा कराच्या कायद्याच्या १३२ कलम व उपकलमाद्वारे करता येते. विशेष करदात्याच्या श्रेणीत नसणाऱ्या या व्यापाऱ्यांनी बनावट देयके तयार केली. भंगार व्यवसायातील व्यापाऱ्यांकडून १८ टक्के वस्तू व सेवा कर मिळणे अपेक्षित होते. औरंगाबाद शहरातील या दोन व्यापाऱ्यांनी २० ते २२ कंपन्यांच्या नावे खोटी देयके केली. कर चुकविण्यासाठी खोटय़ा पावत्यांच्या आधारे ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळविले. साहाय्यक आयुक्त प्रकाश गोपनार, साहाय्यक आयुक्त नितेश भंडारे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात येईल.
१०० हून अधिक कंपन्यांवर नजर
कर चुकविण्याच्या तयारीत असणाऱ्या १०० हून अधिक कंपन्यांवर नजर असल्याचा दावा सहआयुक्त जी. श्रीकांत यांनी केला असून कर चुकविण्यासाठी खोटी देयके बनविणाऱ्या व्यापारी व कंपन्यांवर नजर ठेवली जात आहे.
0 टिप्पण्या