बीए 4 आणि बीए 5 व्हेरियंट सौम्य, आतापर्यंत एकाच रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ
ओमायक्रॉन व्हेरियंटचे उपप्रकार असलेल्या बीए 4 आणि बीए 5 या उपप्रकारांची शहरात आतापर्यंत 15 रुग्णांना लागण झाली. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून, आतापर्यंत एकाच रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.
पुण्यात 28 मे रोजी ओमायक्रॉन व्हेरियंटचे उपप्रकार असलेल्या बीए 4 आणि बीए 5 या उपप्रकारांचा शिरकाव झाला. एकाच दिवशी या उपप्रकारांची लागण झालेल्या 7 रुग्णांचे निदान झाले.
कोरोनाच्या पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या लाटेप्रमाणे चौथ्या लाटेचा उद्रेकही पुण्यातच होणार का? अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली. मात्र, महिनाभरात उपप्रकारांचे केवळ 15 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही एकाच रुग्णाला रुग्णालयात भरती व्हावे लागले. त्याला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज न भासल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तिसर्या लाटेत सौम्य लक्षणे आढळलेल्या रुग्णांना दिले जाणारे औषधोपचार सध्याच्या रुग्णांसाठीही कायम ठेवण्यात आले आहेत.
ओमायक्रॉनचा संसर्ग
पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या तुलनेत तिसर्या लाटेत संसर्गाचा वेग अधिक होता. डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेगही जास्त होता. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. मात्र, रुग्णालयात दाखल कराव्या लागणार्या रुग्णांचे प्रमाण केवळ 4 ते 5 टक्के इतकेच होते.
ऑक्सिजन खालावला नाही
तिसर्या लाटेमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळाला. रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, थकवा, ऑक्सिजनची पातळी खालावणे, अशी लक्षणे पाहायला मिळाली. चौथ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची पातळी खालावण्याचा त्रास होत नसल्याचे निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदविण्यात आले आहे.
600 कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू
शहरात मंगळवारी 600 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले, तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. चौथ्या लाटेतील ही एका दिवसात नोंदवली गेलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 3234 इतकी आहे. मंगळवारी 1953 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 600 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. कोरोनाबाधितांपैकी 8 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी 3.98 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी 461 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 9 मार्च 2020 पासून आजपर्यंत शहरात 46 लाख 89 हजार 804 कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी 6 लाख 71 हजार 504 रुग्णांना कोरोनाची लागण झाली. एकूण 6 लाख 58 हजार 914 जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.12 टक्के इतके आहे. आतापर्यंत 9 हजार 356 बाधितांचा मृत्यू झाला.
बीए 4, बीए 5…
बीए 4 आणि बीए 5 हे ओमायक्रॉन विषाणूचे उपप्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्या संसर्गाचा वेगही ओमायक्रॉनच्या तुलनेत कमी आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी उपप्रकारांचे रुग्ण मर्यादित असल्याचे जिनोम सिक्वेन्सिंगमधून दिसून येत आहे. सध्याच्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने अंगदुखी, खोकला, अशक्तपणा अशी लक्षणे
दिसून येत आहेत.
उपप्रकारांचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये भारतात अत्यंत सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. लसीकरण पूर्ण न झालेल्या व्यक्तींमध्ये लक्षणात्मक संसर्गापासून संरक्षण मिळण्याची शक्यता नाही. म्हणजेच, लस न घेतलेल्या लोकांमध्ये उपप्रकारांचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
– डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ
0 टिप्पण्या