भारत-इंग्लंड कसोटी सामना : कर्णधार बुमराची अष्टपैलू चमक ; भारताच्या पहिल्या डावात ४१६ धावा; इंग्लंडची ५ बाद ८४ अशी अवस्था


बर्मिगहॅम :
भारताचा नवनिर्वाचित कर्णधार जसप्रित बुमराने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या प्रलंबित पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर आपल्या अष्टपैलू खेळाची छाप पाडली. बुमराने फलंदाजीत विश्वविक्रमी आतषबाजी केली, तर गोलंदाजीत इंग्लंडच्या तीन फलंदाजांना माघारी धाडत भारताची पकड घट्ट केली.

रवींद्र जडेजाचे तिसरे शतक आणि बुमराची फलंदाजी या बळावर भारताने पहिल्या डावात ४१६ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर इंग्लंडची दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद ८४ अशी अवस्था झाली असल्याने तिसऱ्या दिवशी त्यांना फॉलोऑन वाचवण्यासाठी धडपडावे लागेल.

शनिवारी भारताने ७ बाद ३३८ धावसंख्येवरून पहिल्या डावाला पुढे प्रारंभ करताना उर्वरित तीन फलंदाजांच्या मोबदल्यात ७८ धावांची भर घातली. जडेजाने १९४ चेंडूंत १३ चौकारांच्या साहाय्याने १०४ धावा काढल्या. जडेजाने मोहम्मद शमीच्या (१६) साथीने आठव्या गडय़ासाठी ४८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शमी बाद झाल्यानंतर जेम्स अँडरसनने जडेजाचा त्रिफळा उडवला. मग कर्णधार बुमराने १६ चेंडूंत धडाकेबाज नाबाद ३१ धावा काढल्याने भारताला चारशे धावांचा टप्पा ओलांडता आला. त्याने दोन षटकार आणि चार चौकार खेचले. बुमराने मोहम्मद सिराजसह (२) १०व्या गडय़ासाठी ४१ धावांची भागीदारी केली. अँडरसनने सिराजला बाद करीत भारताच्या डावापुढे पूर्णविराम दिला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने ६० धावांत ५ बळी मिळवले.

त्यानंतर, इंग्लंडच्या डावात बुमराने प्रथम तिसऱ्याच षटकात अ‍ॅलेक्स लीसचा (६) त्रिफळा उडवला. मग झ्ॉक क्रॉवली (९) आणि ऑली पोप (१०) यांना अनुक्रमे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्याद्वारे स्लिपमध्ये झेलबाद केले. त्यामुळे इंग्लंडची ३ बाद ४४ अशी अवस्था झाली. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी चौथ्या गडय़ासाठी ३४ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मोहम्मद सिराजने रूटला (३१) यष्टीरक्षक ऋषभ पंतद्वारे झेलबाद करीत इंग्लंडला आणखी एक हादरा दिला. मग मोहम्मद शमीने जॅक लिचला भोपळाही फोडू दिला नाही. खेळ थांबला, तेव्हा बेअरस्टो १२ आणि कर्णधार बेन स्टोक्स शून्यावर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ८४.५ षटकांत सर्व बाद ४१६ (ऋषभ पंत १४६, रवींद्र जडेजा १०४, जसप्रित बुमरा नाबाद ३१; जेम्स अँडरसन ५/६०)

इंग्लंड (पहिला डाव) : २७ षटकांत ५ बाद ८४ (जो रूट ३१; जसप्रित बुमरा ३/३५)

’ वेळ : दुपारी ३ वा.

’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३

बुमराचा विश्वविक्रम!

भारताचा नवा कर्णधार जसप्रित बुमराने शनिवारी इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात २९ धावा काढून एका षटकात सर्वाधिक २९ धावांचा कसोटी क्रिकेटमधील विश्वविक्रम प्रस्थापित केला. ब्रायन लाराचा विक्रम त्याने एक अधिक धावेसह मोडीत काढला. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज रॉबिन पीटरसनच्या गोलंदाजीवर लाराने २००३-०४मध्ये सर्वाधिक २८ धावांचा विश्वविक्रम साकारला होता. तो १८ वर्षांनी बुमराने मोडीत काढला. बुमराने दोन षटकार आणि चार चौकारांची आतषबाजी केली, तर लारानेही तितकेच षटकार-चौकार मारले. लारा वगळता जॉर्ज बेली (गो. जेम्स अँडरसन, २०१३) आणि केशव महाराज (गो. जो रूट, २०२०) यांनीही एका षटकात २८ धावा काढल्या आहेत. परंतु बेली आणि महाराजची सीमापार फटक्यांची संख्या कमी आहे. २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवराज सिंगने ब्रॉडच्याच एका षटकात सहा षटकार मारले होते.

सर्वात महागडे षटक

ब्रॉडचे षटक कसोटी क्रिकेटमधील सर्वात महागडे षटक ठरले. या षटकात सर्वाधिक ३५ धावा काढल्या. यापैकी २९ धावा बुमराने फटकावल्या, तर सहा अतिरिक्त धावांचा (वाइड चेंडूवरील चौकाराचे ५ व नोबॉलची एक धाव) समावेश आहे.

बेदीचा विक्रम मोडित

बुमराने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात १०व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत सर्वाधिक नाबाद ३१ धावा काढल्या. त्याने १९७६ मध्ये बिशनसिंग बेदीचा ३० धावांचा विक्रम मोडीत काढला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या