तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी औरंगाबादमध्ये ‘सेवाश्रम’कडून वसतिगृह

औरंगाबाद : तमाशामध्ये काम करणाऱ्या कलावंतांच्या मुलींकडे कुटुंबीय खास लक्ष देतात, पण त्याचवेळी शिकून मोठे होण्याचे मुलांचे स्वप्न मात्र अर्धवटच राहते. या दुर्लक्षित मुलांच्या उच्च शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील ब्रह्मनाथ येळंब येथे चिकाटीने काम करणाऱ्या सुरेश राजहंस या कार्यकर्त्याने सेवाश्रम संस्थेच्या माध्यमातून औरंगाबाद येथील सातारा परिसरात नव्याने वसतिगृह सुरू केले आहे. १०वी व १२ वी मधील शिक्षण घेणाऱ्या १५ मुलांची सोय आता केली जात आहे. या नव्या उपक्रमामुळे मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या कार्याने पुढची पायरी गाठली आहे.

तमाशामध्ये काम करणाऱ्या कलावंतांच्या मुलांची परवडच होते. बहुतांश कलावंतांच्या मुलांना त्यांच्या नावासमोर वडिलाचे नाव लावता येत नाही. आईचे नाव घेऊन पुढे वाटचाल करण्यासाठी मार्गक्रमण करणाऱ्या या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न हाताळत बीड जिल्ह्यातील सुरेश व मयूरी राजहंस हे पतीपत्नी काम करतात. या वर्षी ब्रह्मनाथ येळंब येथील सेवाश्रम या स्वयंसेवी संस्थेमध्ये कलावंत व विविध कारणाने अनाथ झालेली ५५ मुले आहेत. या मुलांपैकी काही हुशार मुलांना पुन्हा पालकांकडे साेडले तर ते तमाशामधील छोटी-मोठी कामे करतात आणि त्यांचे आयुष्यही पुन्हा त्याच रहाटगाडग्यात पिचून जाते. त्यामुळे या मुलांच्या उच्चशिक्षणाचा प्रश्न सोडवायचा कसा, असा प्रश्न सुरेश राजहंस यांच्यासमोर होता. त्यातच या वर्षी या मुलांपैकी एका हुशार विद्यार्थ्यांस ८०.८६ टक्के गुण प्राप्त झाले. यापूर्वी अशा मुलांना जवळच्या शिरुर नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी येथे प्रवेश देण्यात आले होते. पण या मुलांसमवेत संपर्क ठेवणे, त्यांच्या समस्या सोडविणे अवघड होत असे. त्यामुळे अशा मुलांचे वसतिगृह शहरात असावे व उच्च शिक्षणाची संधी या मुलांना मिळावी असे ठरवून त्यांनी औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात आता वसतिगृह सुरू केले आहे. ग्रामीण भागात शिक्षणासाठी होणारा खर्च आणि शहरात होणारा खर्च यात मोठे बदल झाले. गणवेशासह शुल्क तसेच पाठ्यपुस्तके हा खर्च देणगीदारांकडून मिळविण्यात आला. शहरातील वसतिगृहासाठी शोधलेल्या जागेचे भाडेही आता खूप कमी आकारण्यात आले.

सद्गुरू सेवा साहित्य मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दर महिन्याच्या किराण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यासाठी लागणारा निधी ते देत आहेत. त्यामुळे आता तमाशा कलावंतांना उच्च शिक्षण मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. सुरेश राजहंस या प्रकल्पाची अधिक माहिती देताना म्हणाले,‘ तमाशा कलावंताच्या मुलीचे शिक्षण ही तर फारच मोठी समस्या आहे. मुलीने पुन्हा फडात नाचावे अशी कुटुंबीयांची इच्छा असते. खूप प्रयत्न केल्यानंतर कसेबसे दहावीपर्यंत मुलींना शिकवायला ते तयार होतात. पण मुलींची काळजी घेतली जाते. मुलांकडे तर कोणीच लक्ष देत नाही. शिकला काय किंवा न शिकला काय, अशी अनास्था असते. प्रवेश देतात एखाद्या शाळेत, पण त्याच्या अभ्यासाकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे उच्च शिक्षणाचे प्रश्न खूप जटिल आहेत. प्रवेश देण्यापासून ते तांत्रिक अभ्यासक्रम शिकविण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो. आता उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करावेत म्हणून औरंगाबादमध्ये वसतिगृह सुरू केले आहे. हे सारे काम संवेदनशील व्यक्ती व व्यक्तिसमूहांच्या माध्यमातून व त्यांच्या आर्थिक सहकार्यातून केले जात आहे.’

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या