राज्यभर अभ्यासिकांचे अमाप पीक


औरंगाबाद:
महाविद्यालयांमधील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया खासगी शिकवणीवर्गाने हातात घेतली आहेच, शिवाय आता अभ्यासिकांचे अमाप पीक आता तालुक्याच्या पातळीवरही आले आहे. वातानुकूलित अभ्यासिका हव्यात असा हट्ट आता पालकही करू लागला आहे. अभ्यासिकेमध्ये एका विद्यार्थ्यांकडून प्रतिमाह ७००- ९०० रुपये आकारले जातात. एका अभ्यासिकतेत ५० जणांचा प्रवेश होईल अशी रचना केलेली असते. एक अभ्यासिका उभारणीसाठी साधारणत: सहा ते आठ लाख रुपयांची गुंतवणूक केली जाते. औरंगाबादसारख्या शहरात किमान १०० हून अधिक अभ्यासिका असल्याचे सांगण्यात येते. 

स्पर्धा परीक्षांबरोबर आता प्रवेशाच्या वेळीच जवळ अभ्यासिका कोणती आहे, त्याचे दर कसे आहेत याची शोधाशोध पालक करत आहेत. भोजनालय, अभ्यासिका आणि शिकवणी वर्ग जवळजवळ असावेत ही मागणी लक्षात घेऊन आता भोजनालये, नाष्टा केंद्र  अशी रचना शहरात विकसित झाली आहेच.  लातूर, अहमदपूर या शैक्षणिक पारूप असणाऱ्या गावात तर प्रत्येक गल्लीत एक अभ्यासिका आहे. घरात अभ्यासच होत नाही, अशी तक्रार करत तरुण मुले अभ्यासिकेत जात आहेत. मोठी घरे असतानाही मुले अभ्यासिकेत जाण्याचा आग्रह करत असल्याचे पालकही आता सांगू लागले आहेत. अभ्यासिकांचा व्यवसाय अधिक रक्कम देणारा असल्याने अनेक जण यात पडले असून महाविद्यालयांशेजारी याचे पेव फुटले आहे. पुणे हे अभ्यासिकांचे मोठे केंद्र बनले आहे. त्यापाठोपाठ नाशिक, औरंगाबाद, नांदेडसह आता तालुक्याच्या पातळीवरही अभ्यासिकांचे पीक आले आहे. स्वमालकीच्या जागेत लाकडी कप्पे करून पिण्याच्या पाण्याची सोय आणि वातानुकूलित यंत्रणेसह अभ्यासिकांची संख्या वाढते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या