Breaking News

ओबीसी, महिला आरक्षण आज निश्चित केले जाणार


आगामी महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आणि महिला आरक्षण आज (शुक्रवारी, २९ जुलै) निश्चित केले जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण कायम ठेवून अन्य आरक्षणे नव्याने निश्चित केली जाणार असल्याने किमान सात ते आठ प्रभागातील दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) आरक्षणासाठी स्थापन केलेल्या जयंतकुमार बांठिया आयोगाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या होत्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ओबीसी आरक्षणासह होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण निश्चित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करताना शुक्रवारी सोडत काढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यासाठीची रंगीत तालीम गुरुवारी घेण्यात आली.

५८ प्रभाग असून त्यातून १७३ नगरसेवक निवडून येणार –

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ५८ प्रभाग असून त्यातून १७३ नगरसेवक निवडून येणार आहेत. निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) या पद्धतीने होणार असून निवडणुकीसाठी अ, ब, क असे तीन सदस्य संख्येचे ५७, तर दोन सदस्य संख्येचा एक असे एकूण ५८ प्रभाग आहेत. यापूर्वी ओबीसी आरक्षणाशिवाय निघालेल्या सोडतीमध्ये २३ जागा अनुसूचित जाती व दोन जागा अनुसूचित जमातीसाठी अशा एकूण २५ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. उर्वरित १४८ जागांमधून ओबीसी प्रवर्गाच्या ४६ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ५१ जागांवर आरक्षण शुक्रवारी निश्चित होईल.

२४ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण –

शहरातील ५८ प्रभागांपैकी २४ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण आहे. त्यामुळे ३४ प्रभागातील अ क्रमांकाची जागा ओबीसी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित केली जाईल. ओबीसींच्या ४६ जागांपैकी उर्वरित बारा जागा अनुसूचित जाती आणि जमातीचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. त्यामुळे या आरक्षित प्रभागातील ब क्रमांकाच्या जागेवर सोडत काढली जाईल. संबंधित प्रभागात अनुसूचित जाती किंवा जमातीचे सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण असेल तर अशा प्रभागात ब क्रमांकाची जागा आपोआप ओबीसी महिलांसाठी आरक्षित होईल. तर ‘अ’ जागा अनुसूचित जाती किंवा जमातीच्या महिलांसाठी आरक्षित असेल तर तेथील ‘ब’ जागा ओबीसी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होईल. एकूण ४६ पैकी २३ जागा सर्वसाधारण गटासाठी आणि २३ जागा महिलांसाठी आरक्षित केल्या जातील.

… त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निश्चित होणार –

ओबीसींच्या आरक्षणाची प्रक्रिया संपल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निश्चित केले जाईल. शहरातील ५८ पैकी ज्या २२ प्रभागात कोणत्याही प्रवर्गातील महिलांसाठी जागा आरक्षित नाही, अशा प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी एक जागा थेट देण्यात येणार आहे. तर ज्या प्रभागात तीन पैकी दोन जागांवर कोणतेही आरक्षण पडलेले नाही अशा प्रभागातील ब क्रमांकाच्या जागेवर सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निश्चित केले जाईल. या पद्धतीने एकूण २२ ते २३ जागा निश्चित केल्या जातील.

दिग्गजांना धक्का –

ओबीसी आणि महिला आरक्षणासाठी नव्याने सोडत निश्चित होणार असल्याने निवडणुकीची समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. काही प्रभागात दिग्गज नगरसेवकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कोणत्या प्रभागात ओबीसीचे आरक्षण पडणार आणि कोणत्या जागेवर महिलांसाठीचे आरक्षण निश्चित होणार,हे जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments