“शिंदेंच्या हाताखाली काम करावं लागण हे कर्माचं फळ, फडणवीस असे अर्धवट…”, संजय राऊतांची ‘रोखठोक’ टीका


एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना ‘रोखठोक’मधून ताशेरे ओढले आहेत. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले हाच खरा भूकंप आहे. पण ते तसे अर्धटव येतील असं कोणालाच वाटलं नव्हतं अशा शब्दात संजय राऊत यांनी ताशेऱे ओढले आहेत.

“उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याने महाराष्ट्रातील एक पर्व संपले. जेमतेम अडीच वर्षांचाच हा कालखंड, पण बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन ते मुक्त झाले. पाच वर्षांसाठी स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांतच कोसळले, ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना सांगितले, ‘‘माझ्याच लोकांनी दगा दिला.’’ चाळीस आमदारांपैकी काहींनी आधी शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार पाडला व याच गटाने भारतीय जनता पक्षाचा पाचवा उमेदवार विधान परिषदेत विजयी केला. दगाबाजीची ही बीजे रोवली जात असताना मुख्यमंत्री याच लोकांवर कुटुंबाचे घटक म्हणून विश्वास ठेवून होते. एका महानाट्यात छत्रपती शिवरायांच्या तोंडी एक ज्वलंत वाक्य आहे. छत्रपती सांगतात, ‘‘शत्रूची फौज कधीच मोजू नका. आपल्यातील फितूर किती ते मोजा!’’, याची आठवण संज राऊतांनी करुन दिली आहे.

“एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किती आमदार आहेत ते सोडा, पण हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले व त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. पक्षांतरबंदीविरोधी कायद्याने त्यांची आमदारकी जाऊ शकते, पण महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर करणाऱ्यांना बळ दिले. जर कोणाला पक्ष बदलायचा असेल तर त्याने जनतेच्या नजरेसमोर बदलला पाहिजे. त्याच्यात जनतेला तोंड देण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. आमच्या लोकशाहीला तेव्हाच बळ लाभेल की, जेव्हा पक्ष बदलणारा राजीनामा देऊन पुन्हा जनतेत जाईल. तसे न करणाऱ्यांना कायद्याने बाद केले पाहिजे व पक्षांतरबंदी कायद्याची बूज राखली पाहिजे. मात्र महाराष्ट्रात वेगळे घडवले गेले. पक्ष बदलणाऱ्या अपात्र ठरण्याची शक्यता असलेल्या आमदारांनी महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवले व राज्यपाल महोदयांनी या घटनाबाह्य कृतीचे ‘पेढे’ खाल्ले!,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

“दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांना अचानक हिंदुत्वाचा आणि भाजपचा पुळका आला हे समजण्यासारखे आहे, पण केसरकर ज्या सावंतवाडी मतदारसंघातून 2019 ला निवडून आले तेथे भाजपबरोबर युती असतानाही केसरकरांविरोधात राजन तेली हा बंडखोर भाजपने उभा केला होता व त्यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वतः आले. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे 30 उमेदवार भाजपने बळ दिलेल्या बंडखोरांमुळे पडले. शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी व्हावी व मुख्यमंत्रीपदावरील शिवसेनेचा दावा कमजोर व्हावा यासाठीच ही खेळी होती. शिंदे गटात आज सामील असलेल्या किमान 17 आमदारांना भाजपने सरळ पाडण्याचे प्रयत्न केले हे सत्य आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

40 आमदारांनी नक्की कोणत्या कारणामुळे पक्ष सोडला? त्यांनी व त्यांच्या प्रवक्त्यांनी सतत वेगळी कारणे दिली असं सांगताना संजय राऊतांनी ती कारणं नमूद केली आहेत.

१) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांना भेटत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांची कामे होतात. या कारणांमुळे पक्ष सोडला असे सांगणे चुकीचे आहे. अजित पवार त्यांच्या आमदारांची कामे करतात. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी करावीत म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगरविकास, समृद्धी महामार्गासारखी मलईदार खाती शिंदे यांना दिली. ही पक्षाचीच घडी होती. ती विस्कटवली कोणी?

२) शिवसेना आमदारांना निधी दिला नाही हे आणखी एक कारण दिले गेले. त्याचं खणखणीत उत्तर जयंत पाटील यांनी दिलं. पाटलांनी शिवसेना बंडखोरांच्या मतदारसंघांतील निधीवाटपाची यादीच वाचून दाखवली. अनेक प्रमुख बंडखोरांच्या मतदारसंघांत 150 ते 250 कोटींपर्यंत निधी देण्यात आला.

शिवसेना-भाजपचे सरकार असताना शिवसेनेच्या मतदारसंघात फक्त 6 टक्के तर भाजपच्या मतदारसंघामध्ये 90-95 टक्के निधी जायचा असे श्री. पाटील सांगतात, ते खरेच आहे.

३) श्री. दीपक केसरकर सांगतात, महाराष्ट्रात जे घडले त्यास संजय राऊत जबाबदार आहेत? शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला हा काय गुन्हा झाला?

४) किमान 16 आमदार ‘ईडी’ व इतर वैयक्तिक कारणांमुळे पळाले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे असे जे म्हणतात त्यांचे येणारे सरकार त्याहून जास्त अनैसर्गिक असणार आहे.

“महाराष्ट्रात भूकंप झाला व असा भूकंप राजकारणात कधी झालाच नव्हता असे वर्णन एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत झाले, पण त्या बंडापेक्षा मोठा भूकंप नऊ दिवसांनी झाला. शिंदे यांच्या बंडामागचे चाणक्य म्हणून संपूर्ण मीडिया देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देत होता, पण सत्य वेगळेच होते. हे बंड थेट दिल्लीच्या सूत्रधारांनी घडवले व महाराष्ट्रातील भाजप त्याबाबत पूर्ण अंधारात होता. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे जे बोलत होते ते नंतर कोसळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसांत सख्य नव्हते. ‘‘मला उपमुख्यमंत्रीपद नको. चंद्रकांत पाटील यांना ते द्या. मला भाजप प्रदेशाध्यक्ष करा’’, अशी त्यांची विनंती शेवटच्या क्षणी फेटाळण्यात आली. कधी काळी आपलाच ज्युनियर मंत्री असलेल्या श्री. शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली. हे त्यांच्या कर्माचे फळ आहे. 2019 मध्ये सत्तेचा 50-50 टक्के फॉर्म्युला त्यांनी स्वीकारला नाही व महाविकास आघाडीचे सरकार त्यामुळे निर्माण झाले. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले व आता बंडखोर शिवसैनिक शिंदे यांना हे पद भाजप हायकमांडने दिले. काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

“महाराष्ट्राचे राजकारण हे आता आदर्श राहिलेले नाही. त्याची खिचडी झाली आहे. सध्या नवे राज्य आले आहे. ज्यांनी ते आणले ते सुखात नांदोत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडले, पण राज्यातील लोक त्यांच्या सत्तात्यागाने हळहळले. ठाकरे यांनी हेच कमवले. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळविले. या सगळ्यात फडणवीसांच्या आयुष्यात भूकंप झाला,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या